चंद्रपूर : वर्धा नदीवरील चिंचाळा येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे सात गावांना पाणीपुरवठा होते. मात्र अलीकडे एमआयडीसी व धारीवाल कंपनीने वर्धा नंदीवर बंधारा बांधून सात गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या नदीला कोरड आणली आहे. हा बंधारा येत्या सात दिवसात प्रशासनाने तोडावा, अन्यथा बंधारा तोडून फेकला जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे चंद्रपूर तालुकाध्यक्ष रजित मासीरकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना दिला आहे.वर्धा नदीवर बंधारा बांधल्यामुळे चिंचाळा, शेणगाव, सिदूर, वांढरी, वेंडली, पिपरी, धानोरा या सात गावांचा पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनोने यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तुम्हीही बंधारा बांधा, असा उलट सल्ला देत एकप्रकारे ग्रामीण जनतेचा अपनाम केला आहे. या बंधाºयामुळे सात गावातील २० हजार लोकांना पाणी पुरवठा बंद होत आहे. शासनाचे पिण्याच्या पाण्याला पहिले प्राधान्य असून नंतर शेती आणि शेवटी उद्योगाला पाणी देण्याचा नियम प्रशासनाने नियम धाब्यावर बसवून उद्योगाला पाणी देण्याची मंजुरी कशी दिली, असा सवाल संभाजी ब्रिगेडने केला आहे.प्रशासनाने सात दिवसात बंधारा तोडावा अन्यथा संभाजी ब्रिगेड सातही गावाच्या लोकांना सोबत घेऊन बंधारा तोडून टाकेल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन जिल्हाधिकारी, आ. नाना श्यामकुळे, तहसीलदार व कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांना देण्यात आले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक चंद्रकांत वैद्य, तालुकाध्यक्ष रजिंत मासीरकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेश कांबळे, शेणगावचे अध्यक्ष मंगेश चटकी, कार्याध्यक्ष ओमेश्वर मेसेकर, सरपंच पारस पिंपळकर, सरपंच डॉ. शरद रणदिवे, गुरुदेव सेवा मंडळचे पदाधिकारी पवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती. प्रशासनाने दखल घेण्याची मागणी आहे.
वर्धा नदीवरील ‘तो’ बंधारा तोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:04 PM
वर्धा नदीवरील चिंचाळा येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे सात गावांना पाणीपुरवठा होते. मात्र अलीकडे एमआयडीसी व धारीवाल कंपनीने वर्धा नंदीवर बंधारा बांधून सात गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या नदीला कोरड आणली आहे.
ठळक मुद्देपिण्याचे पाणी उद्योगाला : सात गावांच्या पाण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे निवेदन