पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष
सावरगाव : नागभीड तालुक्यातील ब्रिटिशकालीन घोडाझरी कालव्यांतर्गत येत असलेल्या मुख्य वितरिकेवरील सोनापूर गावालगत असलेल्या कालव्यावरील पूल खचलेल्या अवस्थेत आहे. सदर पुलाची मर्यादा संपत आल्याने हा पूल कधीही कोसळू शकते. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. अशी पुलाची अवस्था असताना मात्र, पाटबंधारे विभाग या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे.
नागभीड तालुक्यातील जंगलव्याप्त परिसरात छोट्याशा घोडाझरी गावालगत ब्रिटिशांच्या काळात घोडाझरी तलावाची निर्मिती झाली. या घोडाझरी कालव्याच्या सोनापूर गावालगत असलेल्या पूल क्र.४३ वर शेतकऱ्यांच्या शेताला पाणीवाटपासाठी ३ गेज बसविलेले आहेत, शिवाय सदर पुलाचा मार्ग सोनापूरवासीयांसाठी ये-जा करण्याकरिता अत्यंत सोयीचा असा मार्ग आहे. त्यामुळे आजतागायत येथील गावकरी, विद्यार्थी, शेतकरी ग्रामपंचायत असो वा शाळा असो, कुठेही ये-जा करण्याकरिता या मार्गाचाच वापर करीत आले आहेत. मात्र, गेल्या एक वर्षापासून या मार्गांवरील पूल खचलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. त्यामुळे कधीही, केव्हाही या पुलावर अनुचित प्रकार घडू शकतो, अथवा जीवितहानी होऊ शकते. सद्यस्थितीत तरी येथील नागरिकांना जीव मुठीत धरूनच या पुलावरून मार्गक्रमण करावे लागत आहे. दरम्यान, सदर पुलाची अशी गंभीर अवस्था असताना, पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. या पुलाकडे वेळीच लक्ष न दिल्यास आणि अपवादात्मक एखादा अनुचित प्रकार घडल्यास, या बाबीला पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील, असा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे.