लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : महायुतीतील नेते भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यांनी भ्रष्टाचाराने भरलेली तिजोरी, हे या निवडणुकीत मतांकरिता ते वाटत सुटले आहेत. पण, त्यांच्या आर्थिक आमिष व खोट्या आश्वासनांना बडी पडू नका, असे सांगत काँग्रेसचे युवा नेते कन्हैयाकुमार यांनी महाविकास आघाडीला मते देण्याचे आवाहन मतदारांना केले. महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष रावत यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
बेरोजगारांना रोजगार आणि लोकांच्या आवश्यक गरजा या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून जात व धर्माकडे लोकांचे लक्ष महायुती वळवीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. महायुतीची सत्ता आल्यास महाराष्ट्र राज्य अर्थव्यवस्था आणि इतर बाबतीत मागे पडणार आहे. त्याकरिता, आपल्या किमती मतांचा महाराष्ट्र वाचविण्याकरिता, महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला आंदण देत असलेल्यांची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी कामी लावा, असे आवाहन त्यांनी केले.
एक है तो सेफ है, भाजपच्या या नाऱ्याचा समाचार घेत त्यांनी एक म्हणजे अंबानी असा अर्थ होतो, असे ते म्हणाले. त्यांनी विदर्भाचे महत्त्व भाषणातून अधोरेखित केले. येथील गांधी पुतळ्याजवळ झालेल्या या सभेत उमेदवार संतोषसिंह रावत, पवन भगत, संदीप गिरे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, घनशाम मुलचंदानी, ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सूर्या, अब्दुल करीम यांचीही भाषणे झालीत. देवेंद्र आर्य यांनी सूत्रसंचालन केले.