लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : आपली लाडकी बहीण उद्या सजलेल्या लग्नमंडपात वधू होणार या आनंदात तो होता. मात्र, काळाच्या उदरात काही वेगळेच लिहून ठेवले होते. तिकडे बहिणीच्या अंगाला हळद लागत असताना भाऊ रुग्णालयात दाखल झाला. बहिणीवर अक्षता पडण्याच्या दिवशी भावाने जग सोडले. आनंदसोहळ्यात विरजण पडले. ही हृदयद्रावक घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील नीलज येथे घडली. या घटनेने अख्खे गाव हळहळले.ब्रह्मपुरी तालुक्यातील नीलज येथील वासुदेव मांढरे यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वासुदेव आपली पत्नी, एक मुलगा-मुलगी यांच्या सोबतीने मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा वाहतात. घरात लग्नाची बहीण, त्यात अठराविश्व दारिद्र्ये मुलगा क्रिष्णा (२०) ला बघवले नाही. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी तो मुंबईला वर्षभरापूर्वी गेला. तीन-चार महिने मोलमजुरी केल्यानंतर अचानक क्रिष्णाची प्रकृती बिघडली. उपचाराकरिता तो गावी परतला. उपचार करून तो परत मुंबईला गेला. मात्र, आरोग्य साथ देत नसल्याने तो परत गावी आला. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी क्रिष्णाला कावीळ झाल्याचे निदान केले. चार ते पाच महिने विविध ठिकाणी उपचार करण्यात आले. मात्र, क्रिष्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अशात अंकुशच्या बहिणीचे लग्न जुळले. घरात लग्न सोहळ्याची लगभग होती. मात्र त्याचवेळी क्रिष्णावर उपचारही सुरूच होते. शनिवारी बहिणीच्या अंगाला हळद लागली. अशातच क्रिष्णाची प्रकृती अचानक बिघडली. त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. आई-बाबा रुग्णालयात होते. पाहुणे मंडळी बहिणीला हळद लावत होते. ऐन बहिणीच्या लग्नाच्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. मुलीच्या लग्न मंडपात उभे न राहता स्मशानात जाण्याची दुर्दैवी वेळ आई-वडील व त्यांच्या नातेवाईकांवर आली. या घटनेने हळहळ व्यक्त होत होती.मुलाच्या घरी पार पडले लग्नक्रिष्णाचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बहिणीच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली होती. मात्र, घरी लग्न करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे सायंकाळी मुलाकडे लग्नसोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पडला.
बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 11:59 PM
आपली लाडकी बहीण उद्या सजलेल्या लग्नमंडपात वधू होणार या आनंदात तो होता. मात्र, काळाच्या उदरात काही वेगळेच लिहून ठेवले होते. तिकडे बहिणीच्या अंगाला हळद लागत असताना भाऊ रुग्णालयात दाखल झाला. बहिणीवर अक्षता पडण्याच्या दिवशी भावाने जग सोडले.
ठळक मुद्देनीलज येथील हृदयद्रावक घटना : महिन्यांपासून कावीळ आजाराने होता ग्रस्त