घनश्याम नवघडे / रवी रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : दारू माफियांनी मंगळवारी नागभीडच्या एका कर्तव्यदक्ष प्रभारी ठाणेदाराच्या अंगावर गाडी घालून बळी घेतला. या प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. दारू विक्रेते अलिकडच्या काळात मुजोर झालेच होते; आता ते निर्दयी आणि क्रूरही होत असल्याचे या प्रकारावरून दिसून येते. अवैध दारू विक्रेत्यांमुळे आता जिल्ह्यातील सामाजिक आरोग्य धोक्यात आले असून अवैध दारू विक्रेत्यांना कायमस्वरुपी अद्दल घडविण्यासाठी कठोर कायदा व कारवाई श्रृंखला सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.भंडारा जिल्ह्यातील पवनीकडून तोरगावमार्गे मोठ्या प्रमाणावर दारूची अवैध वाहतूक होते. एका स्कार्पिओ गाडीने याच मार्गे मौशीकडून दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती नागभीडचे प्रभारी ठाणेदार छत्रपती किसन चिडे यांना मिळताच ते तातडीने काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन मौशीला गेले. पण झाले उलटेच. ते स्वत:चाच जीव गमावून बसले.चंद्रपूर जिल्ह्यातील गावागावात, मोहल्या-मोहल्यात दारू मिळायला लागली आहे. या अवैध दारूविक्रीने गावातील वातावरण दूषित झाले आहे. बहुतेक गावातील तरूण या व्यवसायाकडे वळले आहेत. अगोदरच हाताला काम नाही. कमी वेळात दिवसभराची रोजीरोटी होते म्हणून त्यांनी या व्यवसायात उडी घेतली आहे. या दारूविक्रेत्यांची मुजोरी एवढी वाढली आहे की, त्यांच्याविरोधात कोणाची 'ब्र' काढायची हिंमत होत नाही. या प्रकाराने सामाजिक स्वास्थ्य पार बिघडून गेले आहे.अधिक नफा कमाविण्याच्या हव्यासापोटी बनावट दारूचे प्रमाण वाढल्याचेही दिसून येत आहे. याचा परिणाम आज जरी दिसत नसला तरी येणाºया आठ दहा वर्षात आज दारू पिणारी पिढी विविध आजारांनी ग्रासलेली दिसेल तेव्हा लक्षात येईल.अशाच एका दारू विक्रेत्याच्या मुसक्या आवळण्यासाठी नागभीडचे प्रभारी ठाणेदार छत्रपती चिडे गेले होते. त्यांनी दारूविक्रेत्याच्या वाहनाचा पाठलाग केला. दरम्यान, एका ठिकाणी वाहन थांबले असता ते आपल्या वाहनातून खाली उतरले. त्याचवेळी दारू विक्रेत्याने आपले वाहन रिव्हर्स करून त्यांना चिरडले. या घटनेबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे दारू विक्रेते पोलिसांचा जीव घेऊ शकण्यापर्यंत निष्ठूर झाल्याने प्रशासनाने गंभीर होऊन कारवाईचे सत्र सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.प्रतिकूल परिस्थितीवर केली मातछत्रपती चिडे हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून या सहायक निरीक्षक या पदापर्यंत आले. त्यांचे आई-वडील वणीजवळील मारेगाव येथे राहत असून ते दोघेही अंध आहेत. चिडे हे पूर्वी भद्रावती नगरपालिकेत नाली बांधकामात काम करायचे. पोलीस म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी जिद्द आणि चिकाटी ठेवून सतत अभ्यास करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली व पोलीस उपनिरीक्षक झाले.पोलीस ठाण्यात स्मशान शांतताएका कर्तव्यदक्ष ठाणेदाराचा अशाप्रकारे शेवट झाल्याने सर्वांचे मन सुन्न झाले. अनेकांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. ठाणेदार छत्रपती चिडे यांच्या मृत्यूचीच सर्वत्र चर्चा होती. त्यामुळे दिवसभर पोलीस ठाण्यात स्मशान शांततेचे चित्र होते.भावाचाही दिवाळीतच झाला होता मृत्यूमृत छत्रपती चिडे यांचा लहान भाऊ गजानन चिडे याचाही मागील वर्षीच्या दिवाळीत विजेचा धक्का बसून मृत्यू झाला होता. यावर्षीच्या दिवाळीत छत्रपतींची हत्या झाली. दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने अंध आई-वडील निराधार झाले आहेत. छत्रपती चिडे यांची मुलगी बीडीएस तर मुलगा दहावीत शिकत आहे. वडिलांचे छत्र हरविल्याने त्यांच्या शिक्षणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
दारू माफियांची क्रूरता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 11:03 PM
दारू माफियांनी मंगळवारी नागभीडच्या एका कर्तव्यदक्ष प्रभारी ठाणेदाराच्या अंगावर गाडी घालून बळी घेतला. या प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. दारू विक्रेते अलिकडच्या काळात मुजोर झालेच होते; आता ते निर्दयी आणि क्रूरही होत असल्याचे या प्रकारावरून दिसून येते.
ठळक मुद्देसहायक पोलीस निरीक्षकाची हत्या : पोलीस प्रशासन हळहळले