ग्राहकांमध्ये नाराजी : नव्या प्लॅनमध्ये मोजावे लागतात १४१ रुपयेसिंदेवाही : भारत संचार निगम लिमिटेड व कृषी विभाग यांच्या विद्यमाने २०११ पासून शेतकरी ग्राहकांसाठी महाकृषी सीयुजी कॉलिंग योजना सुरू झाली. यामध्ये १०८, १०९ आणि १२८ असे तीन प्लॅन ग्राहकांना देण्यात आले. पण नववर्षाच्या पूर्वसंध्येला नोव्हेंबरमध्ये तीनही प्लॅनचे एकत्रिकरण १४१ रुपयांचा सामान्य प्लॅन तयार करण्यात आला. परिणामी ही सुविधा आता महागली आहे. बीएसएनएलची महाकृषी सेवा महागल्याने ग्राहकांत नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांना हवामानविषयक सल्ला, खते, बी-बियाण्यांची उपलब्धता, गुणवत्तेबाबत येणाऱ्या अडचणी, कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती त्वरित कमी खर्चात मिळावी यासाठी सर्वात महत्त्वाची ‘क्लोज युजर ग्रुप’ (सीयुजी) भ्रमणध्वनी सेवा भारत संचार निगमच्या सहकार्याने २०११ पासून सुरू आहे. राज्यात बीएसएनएलचे कृषी प्लॅन अंतर्गत १२ लाख ग्राहक आहेत. जिल्ह्यातही या प्लॅनचे हजारो ग्राहक आहेत. कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि शेतकऱ्यांमधील संवाद वाढावा, कमी खर्चात समन्वय साधला जावा या हेतूने बीएसएनएलने सुरु केलेल्या ‘मोबाईल टू मोबाईल फ्री’ या महाकृषी संचार सुविधेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे यातील १०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळत असलेल्या एक जीबी डेटामुळे शेतकऱ्यांच्या पाल्यांना याचा बराच फायदा झाला होता. पण आता नव्या योजनेत १०८, १०९, १२८ या तीनही प्लॅनचे एकत्रिकरण करून १४१ रुपयांचा नवा प्लॅन तयार करण्यात आला. पण पैसे वाढवून उलट सुविधा कमी आहे. त्यामुळे ग्राहकांत नाराजी आहे. (शहर प्रतिनिधी)
बीएसएनएलची महाकृषी सेवा महागली
By admin | Published: January 24, 2016 12:55 AM