समता सैनिक दलाचे पथसंचलन : ब्रह्मदेशातील भिक्खू संघाची उपस्थिती चंद्रपूर : ६० व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यानिमित्त स्थानिक गोलबाजारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांच्या अस्थिकलशांची भव्य मिरवणूक रविवारी सकाळी काढण्यात आली. यावेळी समता सैनिक दलाच्या सैनिकांनी पथसंचलन केले. त्यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.‘बौद्ध धम्म चिरायू हो’, ‘डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार हो’, अशा विविध घोषणा देत सकाळी ११.३० वाजता मिरवणूक प्रारंभ झाली. मिरवणुकीचे संचालन समता सैनिक दलाचे समता सैनिक करीत होते. त्यांच्या मागे भारतीय बौद्ध महासभेचे उपासक-उपासिका रांगेमध्ये चालत होत्या. या मिरवणुकीत पांढरा गणवेश घातलेले महिला, पुरुष व बालके सहभागी झाले होते. चंद्रपूर शहरातील विविध वस्त्यांमधून स्त्री-पुरुषांचे जत्थे मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक जटपुरा गेट मार्गाने निघाली. पांढऱ्या गणवेशातील मिरवणूक शांततेचा संदेश देत पुढे जात होती. ही मिरवणूक पाहण्याकरिता रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी झाली होती. जटपुरा गेट, पाण्याची टाकीमार्गे मिरवणूक दीक्षाभूमी येथे पोहोचली. तेथे भव्य स्वागत करण्यात आले.आंबोरा येथून डॉ. नंदवर्धन बोधी महाथेरो यांनी तथागत बुद्धाचा अस्थिकलश आणला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीने फुलांची सजविलेल्या रथावर डॉ. आंबेडकर यांचा अस्थिधातू कलश आणला. त्यानंतर गौतम बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांचे अस्थिकलश रथावर एकत्र ठेवण्यात आले. रथावर प्रा. डॉ. नंदवर्धनबोधी महाथेरो, मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरूण घोटेकर, ब्रह्मदेशातील भिक्खु संघ आदी स्थानापन्न होते. तत्पूर्वी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय सहसंघटक सुनील सारीपुत्त यांच्या नेतृत्वात समता सैनिकांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना दिली. यावेळी दलाचे महाराष्ट्र बौध्दिक प्रमुख भास्कर कांबळे, प्रमुख प्रशिक्षक मार्शल रंगारी, मार्शल पुणेकर, मार्शल खरतडे, मार्शल अश्विनी कांबळे, मार्शल प्रवीण कांबळे, मार्शल दीक्षा सोनकांबळे, जिल्हाध्यक्ष शिवचंद्र नागदेवते, प्रदीप डोंगरे, युवराज बडगे यांनी पथसंचलनाचे नियंत्रण केले. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मुनेश्वर गजभिये यांच्या नेतृत्त्वात पांढऱ्या गणवेशातील सदस्य सहभागी झाले. दि ब्लू मिशन ट्रस्टतर्फे अल्का मोटघरे आणि सदस्यांनी ब्रह्मदेशातील भिक्खु संघाला चिवरदान केले.
भीमसैनिकांच्या मानवंदनेनंतर बुद्ध-भीम अस्थिकलश रॅली
By admin | Published: October 17, 2016 12:44 AM