चंद्रपूर : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. दरम्यान, सर्वच व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामध्ये बांधकाम व्यवसायावरसुद्धा संकट कोसळले. सध्या सुरू असलेली कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी होणे गरजेचे होते. मात्र, सिमेंट, लोखंड, विटा या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यांचे दर वाढल्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. परिणामी घर बांधकामाचे स्वप्न बघणाऱ्यांना पुन्हा कामाला स्थगिती द्यावी लागली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व उद्योग आणि व्यवसायावर बंदी घालण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे काम बंद पडले आहे, तर काही बांधकाम व्यवसाय सुरू असला तरी त्यासाठी लागणारे साहित्य आता महागले आहे. विशेष म्हणजे, साहित्याचा तुटवडा भासत असल्याने निर्धारित किमतीपेक्षाही चढ्या दराने साहित्याची विक्री केली जात असल्याचेही बोलले जात आहे.
पावसाळा काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे अर्धवट असलेले बांधकाम पूर्ण करण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. काही जण नाइलाजाने चढ्या दरात साहित्याची खरेदी करीत आहेत. त्यामुळे नाहक त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.