मनसेचे क्रीडा राज्यमंत्र्यांना निवेदन
चंद्रपूर : चंद्रपूर जि्ल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून एव्हरेस्ट सैर करण्याचा मान सुद्धा जिल्ह्यातील विद्यार्थांना मिळाला आहे. तसेच जिल्ह्यातील तरुणांची खेळांकडे वाढते आकर्षण बघता शहरालगत असलेल्या चंद्रपूर म्हाडामध्ये आरक्षित असलेल्या क्रीडांगणातील जागेवर मुलभूत व अत्याधुनिक सुविधांसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात मनविसे तालुकाउपाध्यक्ष करण नायर व पवन जाधव उपस्थित होते.
गेल्या काही दिवसापासून निर्माणाधीण असलेले क्रीडा संकुलाचे काम अजून पूर्णत्वास आले नसल्याने, विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ते त्वरित पूर्ण करून तरुणांसाठी खुले करावे तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरावर खेळामध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना बीओटी तत्वावर क्रीडा संकुलाजवळ दुकान गाळे उपलब्ध करून देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी.अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.