कोरपना : तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्हा सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय असलेल्या कोरपना येथे सिमेंट उद्योगाच्या पुढाकारातून कोविड रुग्णालय उभारण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोरपना हे तालुक्यातील नागरिकांसह तेलंगणा राज्य, यवतमाळ जिल्हा , जिवती तालुक्यातील नागरिकांना जवळचे स्थान आहे. या भागात आरोग्य सेवा पाहिजे तितक्या प्रमाणात सक्षम नाही. त्यामुळे येथील रुग्णांना चंद्रपूर किंवा नागपूर जाण्याशिवाय पर्याय नाही. यात रुग्णांना अनेक जोखीम पत्कारून रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येथे सुसज्ज कोविड रुग्णालय ग्रामीण रुग्णालय परिसरात उभारण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर संभाव्य परिस्थिती लक्षात घेता नागरिकांना योग्य उपचार मिळण्याकरिता कोविड रुग्णालयाची उभारणी होणे अत्यंत गरजेचे आहे.