चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने अवैध बांधकामाविरुध्दच्या कारवाईचा ‘चॉकआऊट’ तयार केला आहे. १ मार्चपर्यंत ही बांधकामे तोडली जाणार, असा ठाम निश्चय मनपाने केला आहे. मात्र बिल्डर लॉबीनेही दबाव वाढविलेला असल्याची माहिती आहे. आजवरचा अनुभव बघता महानगरपालिकेची ही कारवाई किमान यावेळीतरी केवळ फार्स ठरू नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.मागील काही वर्षात शहरात वाट्टेल तसे बांधकाम करण्यात आले आहे. मनपानेही याकडे वेळीच लक्ष दिले नाही. डिसेंबर महिन्यात झालेल्या मनपाच्या आमसभेत शहरातील वाढत्या अवैध बांधकामाचा मुद्दा उचलून धरण्यात आला. त्यानंतर मनपा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. अवैध बांधकामे तोडण्याचा कालबध्द कार्यक्रमच मनपाने तयार केला आहे. याबाबत आयुक्त सुधीर शंभरकर यांनी एक आदेशच काढला आहे. यात नगररचना विभागाने अवैध बांधकामाची निश्चिती करावी, क्षेत्रीय अभियंत्यांनी त्या स्थळावर जाऊन लाल रंगाने अवैध बांधकामावर नोंद करावी, अग्निशमन अधिकारी आणि प्रभारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून पोलिसांच्या सहकार्याने अवैध बांधकाविरुध्द कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात २६ अवैध बांधकामावर ही कारवाई होत असल्याची माहिती आहे. मनपाने तयार केलेला हा कार्यक्रम शहराला सुटसुटीत होण्यास मदत करणार आहे. मात्र यापूर्वीही असा प्रयत्न झाला आहे. मात्र रहेमतनगर वॉर्डातील एक घर अंशत: पाडून ही कारवाई थांबविण्यात आली. त्यावेळी पावसाळ्याची सबब सांगण्यात आली होती. परंतु पावसाळा लोटल्यानंतरही अशी कारवाई होऊ शकली नाही. त्यामुळे मनपाची ही कारवाई यावेळीदेखील केवळ फार्स ठरेल काय, असा प्रश्न आहे.(शहर प्रतिनिधी)
अवैध बांधकामाच्या कारवाईविरुध्द बिल्डर लॉबी एकवटली
By admin | Published: January 08, 2015 10:53 PM