उड्डाणपुलावर मातीचा थर
चंद्रपूर : शहरामध्ये चार ते पाच उड्डाणपूल आहेत. मात्र, या पुलांच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासनाचे पाहिजे तसे लक्ष नाही. परिणामी, पुलावर मोठ्या प्रमाणात मातीचा थर साचला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेने पाणपोई सुरू करावी
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून तापमान वाढत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने चौकाचौकात पाणपोई सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी अनेक सामाजिक संस्थांनी पाणपोई सुरू केल्या होत्या.
बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरातील चौकाचौकात मोठमोठे बॅनर लावले जात आहेत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. याकड महापालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
सिटीबस सुरू कराव्या
चंद्रपूर : चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, सिटीबस नसल्यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने शहरात सिटीबस सुुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
पाणीपुरवठा योजना त्वरित सुरू करा
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात नव्याने पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, काम अतिशय धिम्या गतीने सुरू असल्याने, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही योजना त्वरित सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
फूटपाथवरील वाहने हटवावीत
चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर रोडवरील वरोरा नाका चौक ते कुंदन प्लाझा चौकापर्यंत काही व्यावसायिक अगदी रस्त्यावरच वाहने पार्किंग करीत आहेत, तसेच काही व्यावसायिक नवीन वाहनेही रस्त्यावरच लावतात. त्यामुळे अन्य वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन वाहने हटवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
उद्यानाचे अस्तित्व धोक्यात
चंद्रपूर : शहरात काही वार्डांमध्ये मोकळ्या जागेवर नव्याने लहान उद्यान तयार करण्यात आले आहे. मात्र, या उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.
पाणी एटीएमची तपासणी करावी
चंद्रपूर : शहरातील पडोली, तसेच अन्य काही ठिकाणी नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी पाणी एटीएम कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मात्र, कक्षाची नियमित तपासणी, तसेच स्वच्छता केली जात नसल्यामुळे पाणी एटीएम केंद्रातून आजार होण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.