खडसंगी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तपश्चर्येद्वारे पावन झालेल्या तपोभुमी गोंदोडा परिसरात दीड कोटी रूपये निधी खर्चून सुंदर वनउद्यान येत्या वर्षभरात तयार करण्यात येईल, अशी घोषणा वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त चिमुर तालुक्यातील तपोभूमी गोंदोडा येथे आयोजित गोंदोडा महोत्सवात सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना मुनगंटीवार पुढे म्हणाले, अर्थमंत्री म्हणून मी मांडलेल्या पहिल्या अर्थसंकल्पात तपोभूमी गोंदोडा गुंफा परिसराच्या विकासासासाठी निधी जाहीर केला. यापूवीर्ही विधानसभेच्या माध्यमातुन संघर्ष करून नागपूर विद्यापीठाला वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नांव देण्याच्या मागणीसंदर्भात यश मिळविले. वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मरणोत्तर भारतरत्न या उपाधीने सन्मानित करावे, या मागणीसाठी विधानसभेत मी अशासकीय ठराव मांडला व राज्य सरकारला केंद्र शासनाकडे शिफारस करण्यास भाग पाडले. राष्ट्रसंतांना अपेक्षित असलेली दारूबंदी चंद्रपूर जिल्ह्यात लागू केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांमध्ये मोठी सामाजिक ऊर्जा आहे. समाजाला सकारात्मक दिशा देण्याची शक्ती आहे. त्याच्या विचारांचा अंगीकार करत या राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे प्रतिपादन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना केले.यावेळी बोलताना आ. कीर्तीकुमार भांगडिया यांनी तपोभुमी गोंदोडा परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल ना. सुधीर मुनगंटीवार यांचे जाहीर आभार मानले. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे आ. कीर्तीकुमार भांगडिया म्हणाले. यावेळी विधान परिषद सदस्य आ. मितेश भांगडिया, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, भाजपा नेते प्रमोद कडू, जि.प. उपाध्यक्षा कल्पना बोरकर, जि.प. सभापती देवराव भोंगळे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय गजपुरे, डॉ. श्याम हटवादे, धनंजय मुंगले, प्रवीण मोहुर्ले आदींची उपस्थित होती. यावेळी गोंदाडा गुंफा परिसरात पर्यटन योजनेंतर्गत मंजूर झालेल्या सभागृह तसेच सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे भूमिपूजन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला गुरूदेव भक्तांची व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. या गुंफा महोत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. साहित्य विक्रीचे स्टॉलही लावले आहेत. (वार्ताहर)
परिसरात वनउद्यानाची निर्मिती करणार
By admin | Published: January 25, 2016 1:32 AM