जिवती : अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील भारी ग्रामपंचायतीमधील घोडणकप्पीत गेल्या चार महिन्यांपासून तर भारीमध्ये २५ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करीत अंधारात रात्र काढावी लागत आहे. या बाबीची लेखी व तोंडी तक्रार दिल्यानंतरही दुर्लक्ष केले जात असून विचारणा करणाऱ्या ग्राहकांना उडवाउडवीचे उत्तर देत असभ्य वर्तणूकही दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या या क्षेत्रात नियमित विद्युत पुरवठा सुरु ठेवण्याचे शासनाचे आदेश असताना भारी, घोडणकप्पी, खडकी, कुंभेझरी अशी अनेक गावे गेल्या अनेक दिवसांपासून अंधारात आहे. तर वादग्रस्त असलेल्या १४ गावात मात्र अजूनही महाराष्ट्राची वीज पोहोचली नसल्याचे चित्र आहे. वारंवार नागरिकांकडून विद्युत पुरवठा सुरु करा, अशी मागणी केली जाते. मात्र विद्युत विभागाने गावात केवळ खांब उभे केले. इतर कामे करण्यासाठी ते टाळाटाळ करीत असल्याचे बोलले जात आहे. कुठे वीजपुरवठा खंडीत तर कुठे विजेचा लंपडाव ही कायमची समस्या असली तरी यामुळे अनेकाची कामे रेंगाळली जात आहे. एकाच कामासाठी नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागतात. त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसत आहे. (तालुका प्रतिनिधी)
विद्युत विभागाच्या भोंगळ कारभाराने अनेक गावे अंधारात
By admin | Published: September 25, 2015 1:38 AM