भद्रावती : तालुक्यातील मांगली (रैयतवारी) शेत शिवारातून आपली कामे आटोपून बैलबंडीद्वारे घरी परतताना वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने बैल ठार झाला. अज्ञात इसमांनी रस्त्यावरील खुल्या जागेवर जिवंत विद्युत तारा टाकून ठेवल्या होत्या. ही घटना शनिवारच्या रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली.बैलाला विद्युत तारेचा झटका लागताच बैलबंडीवर बसून असलेला मालक आणि नोकरांनी वेळीच खाली उड्या घेतल्याने त्यांचा जीव वाचला. यशवंत परसराम कांबळे (७०) व राजू बापूराव वानखेडे असे मालक व नोकरांची नावे आहे.या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसांत करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तेथील विद्युत तारा व इतर साहित्य जप्त केले असून अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून शिकारीच्या घटनांत वाढ झाली असून अनेक जण शिकारीसाठी विद्युत तारांचा वापर करीत आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)
शिकारीसाठी लावलेल्या विद्युत तारांमुळे बैल ठार
By admin | Published: November 23, 2015 12:57 AM