प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय परिसरात अतिक्रमण : महसूल प्रशासनाची कारवाईचंद्रपूर : शहरातील चांदा रैय्यतवारी येथील सर्व्हे क्रमांक ५०३/१ मध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत प्रस्तावित आहे. मात्र या जागेसह बाजूच्या जागेवर शहरातील शेकडो नागरिकांनी कंपाऊंड बांधकाम, कच्चा झोपड्या व इतर साहित्य टाकून अतिक्रमण केले होते. मंगळवारी सकाळी तहसील कार्यालय व महानगर पालिकेची संयुक्त चमू अतिक्रमणस्थळी दाखल होवून तीन बुलडोजरच्या साह्याने अतिक्रमण हटविले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिक्रमण हटविताना जे सामान सापडले, ते सर्व सामान जप्त करण्यात आले आहे. बल्लारपूर बायपास मार्गावर रैय्यतवारी परिसरात वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा प्रस्तावित असून बांधकामालाही मंजूरी मिळाली आहे. मात्र शहरातील काही नागरिकांनी या जागेवर अतिक्रमण करून कच्चे व पक्के स्वरूपाचे सीमांकण केले होते. याबाबत तलाठ्याच्या अहवालावरून चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी भानुदास गायकवाड यांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश तहसीलदारांना दिले होते. तहसीलदार संजय वानखेडे यांनी अतिक्रमण हटविण्यासाठी चमू गठित करून महानगर पालिका प्रशासनाची मदत घेतली. चोख पोलीस बंदोबस्तात महसूल व मनपा प्रशासनाची चमू अतिक्रमणस्थळी दाखल झाली व तीन जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण हटविले. यात अनेकांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. कारवाई दरम्यान उपविभागीय अधिकारी भानुदास गायकवाड, तहसीलदार रामटेके, नायब तहसीलदार कपील घोरपडे, निलेश पाटील व अश्विनी नंदेश्वर यांच्यासह मनपाचे सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, झोन क्रमांक ३ चे प्रमुख सुभाष ठोंबरे, अभियंता वनकर, अतिक्रमण दलाचे प्रमुख नामदेव राऊत, रामनगरचे ठाणेदार संपत चव्हाण, दंगा नियंत्रण पथक व फायर ब्रिगेड दलाची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)अतिक्रमणावरून झाले होते वादवैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित असलेल्या परिसरात अतिक्रमण करणे गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होते. काही दिवसांपुर्वी याच परिसरात अतिक्रमण केल्याच्या कारणावरून दगडफेक झाली होती. वैद्यकीय महाविद्यालय येथे होणार असल्याने परिसरात अतिक्रमण करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
सरकारी जागेवरील अतिक्रमणावर चालला बुलडोजर
By admin | Published: January 18, 2017 12:34 AM