भद्रावती : शहरातील मुख्य बाजारातील नगर मार्केट येथील मेडिकल स्टोअर व फूटपाथवरील दुकानाला अचानक आग लागल्याने दोन्ही दुकाने जळून खाक झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. यात दुकानदारांचे चार लाखांचे नुकसान झाले आहे. वेळेत आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
नगर मार्केट येथील संजय वसंत बेलगावकर यांची मेडिकल व जनरल तसेच त्यांच्या समोर मंगेश सहारे यांचे पूजासाहित्याचे दुकान आहे. मध्यरात्री अचानक दुकानाला आग लागली. आगीचा धूर दिसताच नागरिकांनी याबाबतची माहिती बेलगावकर यांना दिली. नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना माहिती मिळताच त्वरित नगर परिषदेचे अग्निशमन वाहनाला सूचना दिली. मात्र ते नादुरुस्त असल्याने आयुध निर्माणी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे सहज शक्य झाले. मुख्याधिकारी पिदुरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. भद्रावती पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. शॉर्टसर्किटने आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे.