नियमांची ऐसीतैसी : संस्थाचालकांची मनमानीमुळे पालक त्रस्तसिंदेवाही : शाळा किंवा कॉन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी स्कूल बस चालविल्या जातात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक शाळांमध्ये वाहतूक समिती गठित केली जाते. मात्र, येथील अनेक शाळांमधील चिमुकल्यांना गॅसवर धावणाऱ्या व्हॅनमध्ये कोंबून ने-आण केली जात असतानाही समितीचे पदाधिकारी काहीच करीत नाही. या समित्या केवळ नावापुरत्या ठरल्याचे चित्र बघायला मिळत आहे.स्पर्धेच्या युगात पाल्याला दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून प्रत्येक पालक धावपळ करताना दिसत आहे. यातून कॉन्व्हेंट संस्कृती उदयास आली. पालकांना आकर्षित करण्यासाठी अनेक सुविधा पुरविल्या जात आहेत. मात्र, या शाळांकडून शासनाच्या कोणत्याही नियमांचे पालन केले जाताना दिसत नाही.स्कूल बसच्या नावाखाली गॅसवर धावणाऱ्या ‘व्हॅन’ मधून चिमुकल्यांची ने-आण केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असताना शिक्षण विभागाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने कॉन्व्हेंट संचालकांची मनमानी वाढत आहे.सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या स्कूल बसचा विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी वापर करणयत यावा, असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र, येथील अनेक व्हॅनमध्ये शासनाने सुचविलेल्या कोणत्याच सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचा स्कूल प्रवास सध्या धोक्यात आला आहे. कॉन्व्हेंटचे संस्थाचालक केवळ पैसा कमावण्याच्या नादात विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ करीत आहेत. मात्र, शिक्षण विभागाकडून कोणतीच कारवाई केली जात नससल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)
गॅसवर धावणाऱ्या ‘व्हॅन’ बनल्या ‘स्कूल बस’
By admin | Published: July 23, 2015 12:50 AM