घनश्याम नवघडे
नागभीड : अखेर रेल्वेने बल्लारशा - नागभीड - गोंदिया या मार्गावर पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. २८ सप्टेंबरपासून या मार्गाने पॅसेेंजर रेल्वे गाड्या धावणार आहेत. या रेल्वे गाड्या धावणार असल्याने नागभीड रेल्वे जंक्शनवरील रेल्वे गाड्यांची ती धडधड आणि निवेदिकेच्या गोड आवाजातील सूचना पुन्हा कानी पडणार आहेत.
नागभीड येथे दक्षिण-पूर्व रेल्वेचे जंक्शन आहे. १५० एकर जमिनीत हे रेल्वे जंक्शन विस्तारले आहे. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी बांधलेल्या अनेक इमारती याठिकाणी अद्यापही ताठ मानेने उभ्या आहेत. येथून गोंदिया, बल्लारशाह आणि नागपूरकडे रेल्वे गाड्यांचे आवागमन होत असते आणि या गाड्यांनी रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने २३ मार्च २०२०पासून लाॅकडाऊन सुरू केले आणि या गाड्या बंद करण्यात आल्या.
गाड्यांचे आवागमन बंद झाल्याने नागभीड रेल्वे जंक्शनला अवकळा प्राप्त झाली होती. एरव्ही नेहमीच माणसांच्या गर्दीने फुलणारे व हलकल्लोळाने गजबजून जाणारे हे जंक्शन निर्मनुष्य तसेच अबोल व नि:शब्द झाले होते. गाड्या सुरू असताना नेहमीच दिसणारी माणसांची लगबग दिसेनाशी झाली होती. नेहमीच व्यस्त दिसणारे व स्थानकावरच्या फलाटांवर वावरणारे रेल्वेचे सुटबुटातील व गणवेशातील अधिकारी, कर्मचारी त्यांच्या कार्यालयात कार्यालयीन काम करत कसातरी वेळ काढताना दिसत होते. नाही म्हणायला येथून मालगाड्या आणि सुपर गाड्यांचे आवागमन सुरू होते, पण म्हणावी तेवढी हलचल नव्हती.
बॉक्स
त्यांना पुन्हा मिळणार रोजगार
या स्थानकाच्या फलाटावर व गाड्यांच्या डब्यातून चहा, नाश्ता व विविध वस्तूंची विक्री करून आपली गुजराण करणारे शेकडोजण रोजगाराअभावी हैराण झाले होते. तेसुद्धा वाट पाहत होते. त्या दिवसांची ज्या दिवसांनी त्यांना रिकामे कधी बसू दिले नाही. पण कोरोना हा संसर्गजन्य आजार आटोक्यात येत नसल्याने रेल्वे विभागापुढेही अडचणी होत्या. आता या अडचणी दूर झाल्याने रेल्वे विभाग २८ सप्टेंबरपासून या पॅसेंजर सुरू करत आहे. मागील सर्व बाबी इतिहासात जमा होणार असून, नागभीड येथील रेल्वे जंक्शनला पुन्हा पूर्वीचेच वैभव प्राप्त होणार आहे.