लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे दोन वर्षे कोंडी सहन केलेल्या नागरिकांनी यंदा दिवाळीत दणक्यात खरेदी सुरू केली. परिणामी, बाजाराने उसळी घेतली असून आठवडाभरात चंद्रपूर व जिल्ह्यात सुमारे ५०० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. पुढील आठवडाभर खरेदीचा माहोल कायम राहिल्यास ही उलाढाल दीड हजार कोटींच्या घरात जाऊ शकते, अशी माहिती चंद्रपूरच्या ठोक व्यावसायिकांनी दिली.कोरोनामुळे दोन वर्षांपासून बाजारपेठांची स्थिती अतिशय वाईट होती. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मोठे, मध्यम, लघू व सूक्ष्म उद्योगांना टाळे लागले. जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या बाजारपेठांची रया गेली. कोरोना गेल्याने निर्बंधमुक्त सण उत्सवांना सुरुवात झाली. त्यामुळे यंदा व्यावसायिकांनीही जादा भांडवल गुंतवून नवीन माल भरला. खरेदीसाठी चंद्रपुरातील बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे. लहात दुकानांतही ग्राहकांची गर्दी दिसत आहे. नोकरदारांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकही तालुका स्थळावरील बाजारात येऊन वस्तूंची खरेदी करीत आहेत. यंदा नोकरदार व कामगारांच्या हातात दिवाळीपूर्वीच बोनस पडल्याने बाजारात चैतन्य दिसून आले. यंदाच्या दिवाळीला प्रत्येकच कुटुंंब कपडे, इलेक्ट्राॅनिक्स व अन्य जीवनावश्यक वस्तू खरेदीला प्राधान्य देत आहे.
कापड बाजार सर्वाधिक तेजीत- कापड व्यावसायिकांना दोन वर्षे नुकसान झेलावे लागले. सर्वच निर्बंध हटल्याने यंदा आशा वाढविल्या. रेडिमेड कापड विक्रीतील तेजी लक्षात घेऊन ठोक व्यावसायिकांनी मोठी गुंतवणूक केली. कापड व्यवसायात सर्वात मोठी उलाढाल होत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये यंदा नावीन्य चंद्रपूर औद्योगिक वसाहतीमधील लघू व मध्यम कारखाने सुरू झाले. बऱ्यापैकी रोजगार मिळू लागला. कोरोना काळात डबघाईस आलेली इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची बाजारपेठ यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सवापासून पूर्वपदावर आली. सजावटीसाठी नवनवीन वस्तूंची मागणी केल्याने उलाढाल वाढली. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये यंदा नावीन्य दिसून येत आहे.
ऑनलाइन शॉपिंगही वाढली ग्राहक आता घरूनच ऑनलाइन खरेदी करीत आहेत. खरेदीसाठी वेगवेगळ्या साईट्स उपलब्ध झाल्या. त्यांच्याकडून विविध सवलती मिळत असल्याने यंदाच्या दिवाळीत ऑनलाइन खरेदीत वाढ झाली आहे.