चंद्रपूर : जिल्ह्यातील ८३ ग्रामपंचायतींमध्ये ११२ सदस्यपदासाठी १८ मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी सध्या या गावांमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, दोन सरपंचांचीही थेट निवडणूक होणार आहे. यासाठी २ मेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. मात्र बुधवारपर्यंत (दि.२६) एकही अर्ज आला नसल्याची माहिती निवडणूक विभागाकडून मिळाली आहे.
जिल्ह्यातील ८३ ग्रामपंचायतींमध्ये राजीनामा, अनर्हता, निधन आदी कारणाने सदस्यांचे पद रिक्त झाले आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने या ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. २ मे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, ३ मे रोजी अर्जांची छाननी होणार आहे. ८ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज मागे घेणे, त्यानंतर दुपारी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्ह वाटप केले जाणार आहे.
१८ मे रोजी मतदान होणार असून, १९ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी सध्या गावागावात राजकीय वातावरण तापले आहे. आरक्षणानुसार उमेदवारांचा शोध घेणे तसेच गटातटामध्ये तडजोड केली जात आहे. सध्या तरी निवडणूक जाहीर झालेल्या गावांपैकी कुठेही सदस्याची अविरोध निवड झालेली नाही