घरी अठराविश्वे दारिद्र्य - शस्त्रक्रिया व औषध उपचाराकरिता 1 लाखाचा खर्च
गोंडपिपरी : शहरातील आझाद हिंद चौक परिसरात वास्तव्यास असणाऱ्या किशोर लटारे या मजुराला मूत्रपिंडाच्या दुर्धर आजाराने ग्रासले आहे. दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या किशोरला खासगी इस्पितळात शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांनी एक लाख रुपयांचा खर्च सांगितला असून, घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे किशोर लटारे व त्याच्या कुटुंबीयांनी समाजापुढे सोशल मीडियातून मदतीची हाक दिली आहे.
शहरातील किशोर लटारे नामक युवकाने मोटरसायकल दुरुस्ती या उपजीविकेच्या मजुरीवर आजवर कुटुंबाचा गाडा हाकलला. आपल्या कुटुंबासह आई-वडिलांचाही तो सांभाळ करतोय. दरम्यान, किशोरला मूत्रपिंडाच्या दुर्धर आजाराने ग्रासले. दारिद्र्यरेषेखालील जीवन जगण्याला किशोरने सरकारी रुग्णालयांची उंबरठे झिजविले. मात्र आजारावर योग्य उपचार मिळत नसल्याने प्रकृती आणखी खालावत गेली. अशातच शेजारी राहणाऱ्या पंचायत समिती गोंडपिपरीचे माजी उपसभापती रामचंद्र कुरवटकर यांनी किशोर लटारेच्या दुर्धर आजाराचे निदान करण्यासाठी नागपूर येथील खासगी इस्पितळात पाठविले. यावर डॉक्टरांनी विविध चाचण्या करून किशोरच्या मूत्रपिंडाला दुर्धर आजाराने ग्रासले आहे, असे निदान देत शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. या शस्त्रक्रियेसाठी एक लाखाहून अधिक खर्च असल्याचेही डॉक्टरांनी किशोर व त्याच्या कुटुंबीयांना सांगितले. इतका खर्च करणे आवाक्याबाहेर असल्याने लटारे कुटुंबीयांनी समाजासमोर मदतीची मागणी केली आहे.
210821\img_20210818_125800.jpg
मूत्रपिंडाचा आजार ग्रस्त मजुर किशोर लटारे