सिंचनाचा प्रश्न गंभीर : लोकवर्गणीतून केलेली दुरूस्तीही निरूपयोगीचंद्रपूर: गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत पालेबारसा येथील उपकालवा फुटल्याने या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांपुढे सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कालवा दुरूस्तीसाठी हात वर केल्यानंतर शेतकऱ्यांनीच पुढे येऊन लोकवर्गणी गोळा केली. त्यातून कालव्याच्या दुरूस्तीचे काम केले. मात्र भूस्खलन झाल्याने शेतकऱ्यांचा पैसा आणि श्रम वाया गेले. उपकालवा फुटल्याने बोडीत पाण्याचा ठणठणाट असून परिसरातील एका तलावातून इंजीनद्वारे शेतात पाण्याचे सिंचन केले जात आहे. मात्र या तलावातही केवळ २५ टक्के जलसाठा असल्याने तलावातील पाणी पुरेल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. पालेबारसा परिसरातून गोसीखुर्द प्रकल्पाचा उपकालवा गेला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी हा कालवा फुटल्याने कालव्यातील पाणी वाया जात आहे. बोडीपर्यंत पाणी पोहचत नसल्याने शेतकरी शेतीच्या सिंचनापासून वंचित आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले. अधिकाऱ्यांनी पाहणीदेखील केली. मात्र यावर्षी या उपकालव्याची दुरूस्ती कोणत्याही परिस्थितीत शक्य नसल्याचे कारण सांगून अधिकाऱ्यांनी हात झटकले. अखेर परिसरातील शेतकरी एकत्र आलेत. लोकवर्गणी गोळा केली. त्यातून काही रक्कम जमा झाली. या पैशातून या उपकालव्याच्या दुरूस्तीचे काम केले. मात्र काम पूर्ण होताच, उपकालव्यालगत भूस्खलन झाल्याने शेतकऱ्यांचा प्रयत्न व्यर्थ गेला. (प्रतिनिधी)
नहर फुटला, शेत पीक धोक्यात
By admin | Published: October 26, 2015 1:08 AM