भद्रावती : तालुक्यातील मुधोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली रद्द करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र मुधोली येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डाॅ. दिनेश मेश्राम व डाॅ. राजू बोबडे यांची बदली झाल्याचे परिसरातील नागरिकांना कळले. मात्र नुकतेच मुधोली येथे कोविड सेंटर सुरू झाले व संपूर्ण परिसरात संबंधित वैद्यकीय अधिकारी चांगल्या प्रकारे सेवा बजावत आहेत. २४ तास परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी सदर तत्पर असतात. त्यामुळे मुधोली, भामढेळी, कोढेगाव, टेकाडी व काटवल ग्रामपंचायतींकडून संबंधित अधिकाऱ्यांची बदली रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशाराही दिला आहे. निवेदन देताना मुधोलीचे सरपंच बंडू पाटील नन्नावरे, भामडेळीच्या सरपंच सुषमा जीवतोडे, कोंढेगावचे उपसरपंच रवी घोडमारे, टेकाडीचे सरपंच सावसाकडे, मुधोलीचे ग्रा.पं. सदस्य सोमेश्वर पेंदाम आदी उपस्थित होते.