परिमल डोहणे
चंद्रपूर : वाढत्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांनी नवा उपक्रम हाती घेतला आहे. सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून प्रगत तंत्रज्ञान असलेली अद्ययावत गाडी आणणार आहेत. या गाडीमध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी केल्यानंतर जर त्याला कर्करोगाचा धोका असेल तर त्याचे वेळीच निदान होणार आहे. एवढेच नवे तर तज्ज्ञ डॉक्टरांची चमू त्यावर उपचारही करणार आहे. १५ जून रोजी ही गाडी जिल्ह्यात दाखल होणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असून अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर पडले आहेत. ही बाब, माजी मंत्री विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांच्या लक्षात येताच यावर प्रतिबंध कसा घालू शकतो, यासंदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी वेळेपूर्वीच कॅन्सर डिटेक्ट होण्याच्या प्रगत तंत्रज्ञानाची माहिती मिळताच त्यांनी लगेच ती गाडी तयार करण्याचे निर्देश दिले. या गाडीमध्ये प्रगत तंत्रज्ञानाच्या मशिनरीज बसविण्यात आल्या आहेत. त्याद्वारे कॅन्सर होण्याची लक्षणे असतील तर त्याचे वेळीच निदान होणार आहे. यासोबतच कॅन्सर झाला असेल तर तो कोणत्या स्टेजला आहे हेसुद्धा कळणार आहे. त्यामुळे नागरिकांना वेळीच उपचार घेता येणार असून जीव वाचण्यास मदत होणार आहे.
४० प्रकारच्या ब्लड टेस्ट होणार
त्या अद्ययावत गाडीमध्ये एक डॉक्टर, एक नर्स, एक टेक्निशियन, असिस्टंट, हेल्पर यांची चमू राहणार आहे. ती गाडी प्रत्येक गावात जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहे. या गाडीमध्ये ४० प्रकारच्या वेगवेगळ्या ब्लड टेस्टही करण्यात येणार आहेत.
गाडीत असणार या सुविधा
गाडीमध्ये प्रगत तंत्रज्ञानाच्या मशिनरीज बसविण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून ओरल कॅन्सरची स्क्रिनिंग, बेस्ट कॅन्सरची स्क्रिनिंग, कॅन्सर डिटेक्ट होणार आहे. याचा अनेकांना फायदा होणार आहे.
तज्ज्ञ चमू करणार उपचार
गाडीमध्ये आरोग्य तपासणी केल्यानंतर कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर त्याची पूर्ण तपासणी केली जाईल. अमेरिकेतील एका संस्थेशी करार करण्यात आला असून त्यांची तज्ज्ञ डॉक्टरांचा चमू त्या रुग्णांवर उपचार करणार आहे.
जिल्ह्यात फिरताना कॅन्सरमुळे अनेकांचा मृत्यू होऊन संसार उघड्यावर पडल्याचे समोर आले. ही समस्या दूर करण्याच्या अनुषंगाने कॅन्सर होण्यापूर्वीच ते डिटेक्ट करणारी प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान बसविली सुमारे अडीच कोटींची एका गाडी आणली आहे. १५ जून रोजी ती गाडी ब्रह्मपुरीत दाखल होणार आहे. कॅन्सरचे निदान करण्यासाठी अमेरिकन संस्थेशी करार केला असून त्यांची तज्ज्ञ डॉक्टरांची चमू त्या रुग्णांवर उपचार करणार आहे. लवकरच त्या गाडीचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
- विजय वडेट्टीवार, माजी मंत्री, तथा आमदार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र.