चंद्रपूर : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र, ग्रामीण भागात काही नागरिकांमध्ये लसीकरणासंदर्भात गैरसमज आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी गावपातळीवर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुका स्तरावर योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर, नगरविकास विभागाचे अजितकुमार डोके उपस्थित होते.
ग्रामपंचायत स्तरावरील लोकप्रतिनिधी, सरपंच, तलाठी, पोलीसपाटील, कृषी सहायक, आरोग्य कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या सहकार्याने लसीकरणासंदर्भात जनजागृती करावी. ज्या रुग्णांना कोरोना होऊन गेला आहे व ज्या रुग्णांना मधुमेह आहे, अशा रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा आजार आढळून येत आहे. अशा रुग्णांची माहिती घ्यावी. तसेच कोविडमुळे दोन्ही पालक गमाविलेल्या अनाथ बालकांची माहिती तालुकानिहाय गोळा करून घ्यावी, असेही ते म्हणाले.
कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजनेच्या अनुषंगाने गावनिहाय करण्यात आलेल्या उपाययोजना व कार्याची माहिती गटविकास अधिकारी यांच्याकडून जाणून घेतली. तसेच आपले गाव, वार्ड, मोहल्ला कोरोनामुक्त ठेवल्यास जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकतो. यासाठी पंधरा दिवसांतून ग्रामसेवकासोबत किमान एक बैठक घ्यावी तसेच दर पंधरवाड्याला आढावा घ्यावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीत तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना, कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना तसेच जिल्ह्यासाठी कोरोना लसीची उपलब्धता, वितरण, केंद्राची संख्या, नागरिकांचे झालेले लसीकरण, उर्वरित व्यक्तींचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी करावयाची जनजागृती यावर संबंधित सर्व यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.