ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा मांगली गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या गावाला पुराचा फटका वारंवार बसला आहे. पूरपरिस्थितीत जीव मुठीत घेऊन गावकऱ्यांना जगावे लागत आहे. त्यामुळे गावाचे पुनर्वसन हाच उपाय आहे.
जेव्हा जेव्हा महापूर आले आहेत, तेव्हा तेव्हा येथील जनता खूप भयभीत झाली आहे. पूरपरिस्थितीत येथील गावकरी जीव मुठीत घेऊन राहतात. चहुबाजूंनी गावाला पुराचा वेढा असतो. १९९४ पासून येथील ग्रामस्थ पुनर्वसनाची मागणी घेऊन शासन प्रशासनाचा दरवाजा ठोठावत आहेत. यासाठी पुनर्वसन संघर्ष समितीची गावकऱ्यांनी स्थापना करून वेळोवेळी या समितीच्या माध्यमातून गावकरी पुनर्वसनाची मागणी रेटून धरत आहेत. नुकताच या विषयाचे एक निवेदन राज्याचे मदत व पुनर्वसन व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना गावकऱ्यांनी दिले आहे. बऱ्याचवेळा उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना गावाच्या पुनर्वसनाबाबत निवेदने सादर करण्यात आली आहेत.
येथील जनता विशेषकरून १९९४ पासून सातत्याने शासन प्रशासनाला ही मागणी करत आली आहे. या खात्याचे मंत्री ना.वडेट्टीवार असल्याने गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
यावेळी प्रभाकर सेलोकर, पुनर्वसन संघर्ष समितीचे अध्यक्ष गोकुलदास कार, उपसरपंच भावेश दोनाडकर, देवीदास लिंगायत, नानाजी मुंडरे, आंबेवडेकर बनकर, देवाजी कामडी, खुशाल सोंडवले, संजय बिंजवेसह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
कोट
सन १९९४ पासून अनेकदा गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी शासनाकडे वारंवार करण्यात आली आहे. फक्त गावाचे पुनर्वसन दोन-चार कि.मी. अंतरावर करण्यात यावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पुनर्वसन मंत्री आपले आमदार आहेत. त्यांनी जातीने लक्ष घालून मांगलीचे पुनर्वसन करावे.
- गोकूळ कार,
सरपंच, मांगली
ता.ब्रम्हपुरी,
बॉक्स
अनेकदा आलेल्या पुरामुळे गावकऱ्यांमध्ये भीती
सन १९९४, २००५, २००७, २०२१ या वर्षात आलेल्या पुरामुळे गावकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. येथे ३०० घरांची वस्ती असून १२०० - १४०० च्या आसपास लोकसंख्या आहे. गावाला पुराचा वेढा निर्माण होतो. बाहेर निघण्याचा कोणताही मार्ग नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे.
190821\img-20210819-wa0090.jpg
मांगली येथील ग्रामपंचायतीची इमारत