नागभीड व ब्रह्मपुरीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी तथा शालेय पोषण आहार अधिक्षक प्रमोद नाट यांच्यावरील अनियमिततेची तक्रार प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयदास सांगोडे यांनी शासनाकडे केली होती. तसेच सायन्स किट खरेदीची माहिती पंचायत समिती ब्रह्मपुरी येथील माहिती अधिकारी (शिक्षण)च्यांकडे मागणी केली होती. मात्र, विहीत मुदतीत माहिती न मिळाल्यामुळे त्यांनी अपिलीय अधिकाऱ्याकडे अपिल केले. त्यानंतर प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट यांनी सांगोडे यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे दाखल केली. त्यानंतर सांगोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर न्यायालयातून अटपूर्व जामीन मिळविण्यात आला. त्यानंतर जयदास सांगोडे यांनी नाट यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांन्वये गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला दाखल केली होती. तक्रारीनंतर नाट यांच्याविरुद्ध ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन येथे सुधारित अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा २०१५ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
गटशिक्षणाधिकारी नाट यांच्यावर ॲट्राॅसिटी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:51 AM