वरोरा : वरोऱ्यातील डीबी पथकाने वरोरा शहरात शनिवारी धाड टाकून देशी कट्टा विकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना देशी कट्यासह ताब्यात घेतले. यासोबतच दोन अवैध दारू विक्रेत्यांनाही ताब्यात घेत त्यांच्याकडून २३ हजार रुपयांची देशी दारू जप्त केली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर वरोरा पोलिसांनी व्यापक मोहीम राबविली आहे. वरोरा शहरातील कॉलरी वॉर्डात आज दुपारी शकुंतला सुरज बेसेकर या महिलेच्या घरात धाड घातली असता तिच्या घरात १७ हजार ५०० रुपयांची देशी दारू आढळून आली. त्यानंतर वरोरा शहरातील शशिकांत रामचंद्र विरुटकर यांच्याकडून सहा हजार १५० रुपयांची देशी दारू जप्त केली. वरोरा शहरातील गांधी वॉर्डात देवा भैय्याजी नौकरकर (३१) यांच्या घरी कपील सुरेश रैवतेल (२४) रा. हुडकी बिनोरा हा देशी कट्टा व एक काडतूस घेऊन गेला. याबाबत वरोरा पोलिसांच्या डीबी पथकास माहिती मिळताच धाड टाकण्यात आली. त्यावेळी कपील रैवतेल व देवा नौकरकर देशी कट्ट्याची पाहणी करताना आढळून आले. त्यांच्याकडून देशी कट्टा व काडतूस ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध विना परवानगीने शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून अटक केली. अवैध रित्या दारू विक्री करणारे शकुंतला बेसेकर व शशिकांत विरुटकर यांच्या विरुद्धही गुन्हा नोंदवून अटक केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
वरोऱ्यात एक देशी कट्टा व २३ हजार रुपयांची दारू जप्त
By admin | Published: April 05, 2015 1:35 AM