चंद्रपूर : केम तुकूम येथील आदिवासी मुलींचे लैंगिक शोषण प्रकरण ताजे असतानाच बामणी येथील बीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य व पॉलिटेक्निकचे प्राचार्य यांच्याविरुद्ध एका प्राध्यापिकाने विनयभंग व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार केली. तक्रारीवरून दोन्ही प्राचार्यांविरुद्ध बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case of molestation has been registered against two principals in Chandrapur district on the complaint of a professor)
६ ऑक्टोबरला बीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य रजनीकांत मिश्रा व पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्रीकांत गोजे (रा. बल्लारपूर) यांनी महाविद्यालयातील मायनिंगच्या विभाग प्रमुखाच्या प्राध्यापिकेशी विद्यार्थ्यांना आमच्याविरोधात भडकावतात यावरून भांडण केले व या भांडणात दोन्ही प्राचार्यांनी प्राध्यापिकेचा हात ओढला व विनयभंग केला, असा आरोप प्राध्यापिकेतर्फे केला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार न देण्याची समज इतर स्टाफतर्फे प्राध्यापिकेला देण्यात आली व त्यांना आपल्या गावी पाठविण्यात आले.
त्यानंतरही प्राचार्यातर्फे अश्लील मॅसेज आणि जीवे मारण्याची धमकी देणे सुरू होते, असे प्राध्यापिकेने म्हटले आहे. शेवटी १७ ऑक्टोबरला प्राध्यापिकेने दोन्ही प्राचार्यांविरुद्ध बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार केली. दोन्ही प्राचार्यांविरुद्ध विनयभंग व जीवे मारण्याच्या धमकीअंतर्गत भादंवि ३५४, ३५४ (अ), ३५४(अ)(१)(आय)३५४(ब), ३५४(५), ५०६,५०९,३२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रमोद रासकर करीत आहेत.