लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर (चंद्रपूर) : दोन अल्पवयीन मुलींवर दोन नराधमांकडून अत्याचार झाल्याची बाब पुढे आल्यानंतर सोमवारी रात्री चिमूरपोलिस ठाण्यावर चालून जात टायर जाळणे व पोलिस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या जमावावर चिमूर पोलिसांनी कारवाईचे शस्त्र उगारले आहे. याप्रकरणी ओळख पटलेल्या जमावातील २० आंदोलकांवर भारतीय न्याय संहिता कलम १९१ (२), १८९(२), १९१(३), १३२, ३२९ (४) व सार्वजनिक संपत्तीची हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासून अन्य आंदोलकांवर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये शंभरावर आंदोलकांवर कारवाईचे संकेत ठाणेदार संतोष बाकल यांनी दिले. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
चिमूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना पुढे आल्यानंतर परिसरातील नागरिक संतप्त होऊन आरोपींच्या घरावर चालून गेले. ही वार्ता कळतात चिमूर ठाणेदार आपल्या सहकाऱ्यांसह तेथे आहे. ठाणेदार संतोष बाकल यांनी त्याच ठिकाणी मुलीच्या आईकडून तोंडी तक्रार स्वीकारली. यानंतर रशीद रुस्तम शेख याला ताब्यात घेऊन ठाण्याकडे घेऊन गेले. दुसरा आरोपी नसीर वजीर शेख हा पोलिसांना शरण आला. जमाव आक्रमक होत असताना पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी ठाणेदार बाकल यांच्या फिर्यादीवरून ओळख पटलेल्या जमावातील २० जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेज पाहून आणखी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार बाकल यांनी दिली.
आरोपींना ताब्यात द्या, जमाव झाला होता संतप्त
- संतप्त जमाव पोलिस ठाण्यावर चालून गेला. जमावाने टायर जाळून घटनेचा निषेध नोंदविला. यानंतर जमाव आक्रमक होऊन ठाण्याच्या दारावर गेला. आरोपींना आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करू लागला.
- जमाव अनियंत्रित झाल्याने धक्काबुक्की सुरू झाली. यानंतर याचे रूपांतर पोलिस ठाण्यावर दगडफेक करण्यात झाले. यामध्ये पोलिस ठाण्याच्या खिडकीच्या काचा फुटल्या. तसेच एक महिला शिपाई व एक होमगार्ड जखमी झाले.
त्या दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
- चिमूर (चंद्रपूर) : चिमूर शहरातील एका वस्तीत राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर त्याच वॉर्डात राहणाऱ्या रशीद रुस्तम शेख व नशीर वजीर शेख या दोन आरोपींनी अत्याचार केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली होती.
- पोलिसांनी दोन्ही आरोपींवर विविध गुन्हे दाखल करून अटक केली. मंगळवारी सत्र न्यायालय वरोरा यांनी आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली होती.
- बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.