गोंडपिपरी : गाेंडपिपरी - धाबा मार्गावर गोजोली -सोमनपल्लीजवळ रेतीची अवैधरीत्या तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला. ही कारवाई तलाठी पगाडे, सहकारी सतीश नेवारे व होमगार्ड कर्मचाऱ्यांनी केली. घटनास्थळाचा पंचनामा करून जप्त केलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयात उभे करण्यात आले. एमएच ३४ एल ९२४२ ट्रॅक्टर व ट्रॉली क्रमांक एमएच ३४ एपी १४७० या ट्रॅक्टरवर महसूल दंड अधिनियमांतर्गत कारवाई करून एक लाख दहा हजार ९०० रुपये इतका दंड ठोठावण्यात आल्याची माहिती तहसीलदार के. डी. मेश्राम यांनी दिली.
तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या नद्यामुळे मुबलक प्रमाणात विविध घाटांमध्ये रेतीसाठा उपलब्ध आहे. मात्र शासनाने गेल्या वर्षीपासून रेती घाटांच्या लिलावावर बंदी आणल्यामुळे शासकीय तसेच खासगी अनेक बांधकामे रखडली होती. याचाच गैरफायदा घेत रात्रीच्या आडोशात ट्रॅक्टरच्या साहाय्याने रेतीची चोरटी वाहतूक करून विक्रीचा गोरखधंदा सुरू केला होता. यावर गोंडपिपरी उपविभागीय अधिकारी संजय कुमार डव्हळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार के. डी. मेश्राम यांनी मंडळ अधिकारी सुर्वे यांच्या अधिनस्थ तलाठी, पोलीस पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले एक बैठे पथक शहरात तैनात करून रेती चोरीबाबत गोपनीय माहिती देण्याकरिता एक भ्रमणध्वनी क्रमांकही कार्यान्वित केला आहे. या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.
===Photopath===
080621\img-20210608-wa0001.jpg
===Caption===
रेतीची चोरटी वाहतूक करणारे जप्त केलेले ट्रॅक्टर