लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : अतिदुर्गम जिवती तालुक्यात यंदा पहाडावर अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे यंदा जानेवारी महिन्यापासूनच नदी, नाले व गावतलावही कोरडे पडण्याची शक्यता निर्माण झाली.जिवती तालुक्यात एकूण ८३ गावे आहेत. या गावांची लोकसंख्या ७० हजार एवढी आहे. परिसरात सिंचनाच्या सोयीसुविधा नाहीत. संपूर्ण कोरडवाहू क्षेत्र असून निसर्गाच्या पावसावरच येथील शेती अवलंबून आहे. मागील वर्षी निसर्गाने दगा दिला. पुरेसा पाऊस झाला नाही. परिणामी, अनेक तलाव व बंधारे कोरडे पडले आहेत. काही गावात सिंचनाच्या योजना पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शाश्वत शेती करता येत नाही. पुरेसे उत्पन्न घेणे दूरच राहिले. दरवर्षी निसर्गाच्या पावसाचे प्रमाण अत्यल्प होत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. एप्रिल-मे महिन्यापासून सुरू होणारी पाणी टंचाई यंदा जानेवारीतच सुरू झाली आहे. अनेक गावातील नदी-नाले व गाव तलाव कोरडे पडले आहेत. बहुतेक शेतकरी पाण्याअभावी पारंपरिक शेती करतात.यातून खर्चही निघत नाही. शेती व पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याने पहाडावरील नागरिकांना उन्हाळ्यात संकटांचा सामना करावा लागणार आहे. संभाव्य टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी. रखडलेली सिचंन प्रकल्पाची कामे पूर्ण करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी निवेदनातून केली आहे.
पहाडावर जलसंकट उद्भवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 12:25 AM
अतिदुर्गम जिवती तालुक्यात यंदा पहाडावर अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे यंदा जानेवारी महिन्यापासूनच नदी, नाले व गावतलावही कोरडे पडण्याची शक्यता निर्माण झाली.
ठळक मुद्देशेतीचे नुकसान : अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी नाही