लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आता कोरोनाची परिस्थिती आरोग्य विभागाच्याही हाताबाहेर जात आहे. अनेकांना खाटा उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना उपचारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान, सोमवारी ९७४ नव्या रुग्णांची भर पडली असून १० जणांचा जीव गेला आहे. कोरोनाने आजपर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ५०२ वर पोहचली आहे. तर बाधितांची संख्या ३४ हजार ५०३ वर गेली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नागरिकांनी स्वत:ची काळजी स्वत: घेणे सध्यातरी अत्यंत गरजेचे आहे.चंद्रपूर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आदी जिल्ह्यांमध्येही कोरोना उद्रेक सुरूच आहे. रुग्णसंख्या तसेच मृत्यूदर झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्याचीही अवस्था सध्या बिकट झाली आहे. शासकीय तसेच खासगी रुग्णालये फुल्ल झाल्यामुळे बेड मिळणे कठीण झाले आहे. अनेकांना बेड मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागत असून काहींना घरीच राहून औषधोपचार घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिल्या जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ८८८ कोरोना रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यांच्यावर खासगी, सरकारी तसेच गृहअलगीकरण करून उपचार सुरू आहेत. यामध्ये सोमवारी एकाच दिवशी ९७४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३४ हजार ५० वर जाऊन पोहचली आहे. नागरिकांनी आणखी बेकिकिरी केली तर ही रुग्णसंख्या आणखी झपाट्याने वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यात मागील २४ तासात ३५४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत ३ लाख ४ हजार ४९८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख ६५ हजार १३५ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
चंद्रपूर, चिमूर तालुक्यात प्रत्येकी तीन तर वरोरात दोघांचा मृत्यूआंबेनेरी तालुका चिमूर येथील ५६ वर्षीय पुरुष, सोनेगाव बु. ता. चिमूर येथील ६५ वर्षीय महिला, पिपर्डा ता. चिमूर येथील ५० वर्षीय महिला, चंद्रपूर शहरातील सरकारनगर येथील ३८ वर्षीय महिला, भिवापूर बंगाली कॉलनी येथील ५८ वर्षीय महिला व जटपुरा गेट येथील ६२ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी येथील ४५ वर्षीय पुरुष, गुरुमाऊली नगर वरोरा येथील ७० वर्षीय महिला, सलीमनगर, वरोरा येथील ६३ वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.