‘त्या’ आत्महत्येची सीबीआय चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:22 AM2018-08-03T00:22:34+5:302018-08-03T00:23:45+5:30
कोळसा व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरव्यहार सुरू आहे. या प्रकरणाची माहिती पुढे येऊ नये, यासाठी अशोक अग्रवाल यांच्यावर दबाव आणण्यात आला. यातूनच त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने गुरूवारी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोळसा व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरव्यहार सुरू आहे. या प्रकरणाची माहिती पुढे येऊ नये, यासाठी अशोक अग्रवाल यांच्यावर दबाव आणण्यात आला. यातूनच त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने गुरूवारी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
बंद झालेल्या एम्टा खदाणीतून कोट्यवधी रुपयांचा कोळसा चोरून रेल्वे साईडिंगद्वारे विल्हेवाट लावण्यात आली. कोळसा माफियांनीच अशोक अग्रवाल यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. सदर प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा कोळसा घोटाळा झाला आहे. या प्रकरणातील आरोपींची सीबीआय चौकशी करावी आणि फरार आरोपींना त्वरीत अटक करण्यात यावी, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, ठाणेदार दीपक गोतमारे यांचीसुद्धा भेट घेतली. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, सुभाषसिंह गौर, अॅड. मलक शाकीर, विनोद संकत, अनुसूचित जाती विभाग शहर अध्यक्ष हरिदास लांडे, ब्लॉक अध्यक्ष निखील धन वलकर, दीपक कटकोजवार, शालिनी भगत, वंदना भागवत, बंडोपंत तातावार, प्रकाश अधिकारी, रुचित दवे, शशांकर हलदार आदी उपस्थित होते.
प्रदूषणाकडेही वेधले लक्ष
बाबुपेठ उड्डाणपूल, तीन कोटी ९४ लाख रुपयांचा सिमेंट रस्ता, हॉटेल ट्रायस्ट्रार, लॉ कॉलेज, वनराजिक महाविद्यालय दरम्यानचा बायपास मार्ग, खड्डे व प्रदूषणाकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले. आली. वरोरा येथील एॅम्प्टा खाणीतून कोळशाची चोरी होत आहे. साखरवाही येथेही हाच प्रकार सुरू आहे. या प्रकरणांचा शोध घ्यावा, अशी मागणी शहर काँग्रेसने केली. बांधकाम विभाग,महानगरपालिका वेकोलिची बैठक बोलावून समस्या सोडविण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी दिले.