मूल: आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा अविष्कार होताना दिसत आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी. तसेच शाळेत चालणाऱ्या घडामोडीचा लेखाजोगा बघता मूल तालुक्यातील सुशी दाबगाव येथील कृषक विद्यालयाच्या शिक्षकांनी शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा संकल्प केला. सीसीटीव्ही कॅमेरे लावणारी ग्रामीण भागातील ही पहिलीच शाळा असल्याचे बोलले जात आहे.शहरी भागातील विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाल्याबरोबरच त्याची माहिती मिळते मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहिती मिळण्यास बराच अवधी लागतो. नवीन तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांना अविष्कार व्हावा. वर्गातील चित्र सर्व शिक्षकवृंद व मुख्याध्यापक बघत आहे. हे विद्यार्थ्यांना ज्ञात होत असल्याने शिस्तबद्ध राहण्याची मानसिकता आपोआपच निर्माण होत असते. शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांवरसुद्धा मुख्याध्यापक व संस्थेचे पदाधिकारी निरीक्षण करीत असल्याने शिक्षकातदेखील शिस्त व अध्यापक - अध्ययन प्रक्रिया सुरळीत करण्यात पुढाकार घेतात. हा अनुभव बघायला मिळत असल्याचे बोलले जात आहे. कृषक विद्यालयात विशेष वर्गाचे आयोजन करुन विद्यार्थ्यांचा सराव करुन घेण्यास संपूर्ण शिक्षकवृंद झटत असल्याने गेल्या पाच वर्षापासून ९० टक्के निकाल देणारी ग्रामीण भागातील ही विशेष शाळा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. सहशालेय उपक्रमासोबतच व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना सुसंस्कारिक घडण्याचा प्रयत्न शाळा करीत आहे.सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर यापुढे बायोमॅट्रीक पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये वेळेची शिस्त लागेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा
By admin | Published: July 11, 2015 1:43 AM