दोघे फरार : घरफोड्यातील आरोपीनागभीड : दिवसाढवळ्या घरफोड्या करुन नागभीडकर आणि पोलिसांची झोप उडवून देणाऱ्या चोरट्यांना नागभीड पोलिसांनी जेरबंद केले आहे. या आरोपातील आणखी दोन आरोपी फरार असल्याची माहिती ठाणेदार बी. डी. मडावी यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.तौषिक मतीन खान (२२) व मेहफूज ऊर्फ राजा मेहबुब कुरेशी (१८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर शेख जाफर शेख मुजफ्फर व शम्मा ऊर्फ मामू महमद शफी हे या प्रकरणातील फरार आरोपी आहेत. एप्रिल महिन्यात नागभीड येथे घरफोडीच्या तीन-चार घटना घडल्या होत्या. या सर्व घटना दिवसाढवळ्या झाल्याने नागभीडमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली होती. यात आदर्श कॉलनीतील सागर अनिल पौणीकर यांच्याकडीलही घरफोडीचा समावेश होता. मात्र पौणीकर यांचे शेजारी यश नरेंद्र सोनकुसरे यांच्याकडे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे कॅमेराबद्ध झाल्याने या घरफोडीचे बिंग फूटले. त्यानंतर या चोरट्यांनी तर्वेकर यांच्या पेट्रोलपंपवरुन गाडीत पेट्रोल भरत असताना पेट्रोल पंपवर असलेल्या कॅमेरातही चोरीत वापरलेल्या गाडीचा नंबर आला होता.या सीसीटीव्ही फुटेजवरुन नागभीड पोलिसांनी तपासाची दिशा ठरविली आणि ते आरोपीपर्यंत पोहोचले. आरोपी हे कामठी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. या आरोपींचा नागभीडमध्ये घडलेल्या इतर घरफोड्यात सहभाग असू शकतो, असा पोलिसांचा अंदाज असून त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.अधिक तपास ठाणेदार बी. डी. मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली एम. व्ही. ओगेवार, सुनील गेडेकर करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपी जाळ्यात
By admin | Published: May 26, 2016 1:59 AM