चंद्रपूर : मराठी नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी घराबाहेर जाऊ नका, घरात उपलब्ध साहित्यामध्ये सण साजरा करा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण व खार जमीन विकास मंत्री व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
गुढीपाडव्याचे स्वागत करण्यासाठी दारावर तोरण हमखास लावले जाते. त्याशिवाय गुढी उभारून तिला साखरगाठ्यांची माळ घातली जाते. सोने खरेदी, कपडे खरेदीही केली जाते. मात्र, या खरेदीसाठी यंदा घराबाहेर पडू नये, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन गुढीपाडव्याला खरेदीसाठी बाहेर जाऊ नका, खरेदीसाठी रस्त्यावर गर्दी करून संसर्ग वाढविण्यास मदत करू नका, असेही ते म्हणाले. यंदा मराठी नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाचे सावट असले तरी घरोघरी गुढ्या उभाराव्या, परंतु शोभायात्रेचे आयोजन व सामूहिक आयोजन टाळण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. नागरिकांनी यंदा कोरोनाला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारावी, असे आवाहनही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.