सुधीर मुनगंटीवार : बल्लारपूर मेडिकल असोशिएशनच्या सभागृहाचे लोकार्पणचंद्रपूर : बल्लारपूर मेडिकल असोशिएशनचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून हे वर्ष विविध आरोग्य उपक्रमांनी साजरे करावे, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर मेडिकल असोसिएशनच्या सभागृहाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. डॉ. एस. के. साहा, चंदनसिंह चंदेल, न. प. उपाध्यक्ष संपत कोरडे, कार्यकारी अभियंता अरुण गाडेगोणे, मुख्याधिकारी विपिन मुद्दा, बल्लारपुर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश तुंबडे, डॉ. चंदे, समीर केने, हरीश शर्मा, निलेश खरबडे व आयएमएचे सदस्य यावेळी उपस्थित होते.ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या आमदार निधीतून १५ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या बल्लारपूर मेडिकल असोशिएशनच्या सभागृहाचे शनिवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले, हे सभागृह जनतेची सेवा करण्याचे गृह व्हावे. या सभागृहातून जनतेच्या आरोग्याची सेवाच नव्हे तर आरोग्यविषयक मार्गदर्शन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सुवर्ण महोत्सवी वर्षात बल्लारपूर असोशिएशनने गरीब लोकांच्या आरोग्य संवर्धनासाठी शिबीर आयोजित करावे. या क्षेत्राचा आमदार म्हणून आपण सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत.यावेळी त्यांनी घेतलेल्या विविध निर्णयाची माहिती आपल्या भाषणातून दिली. इतर ठिकाणी जे जे चांगले आहे, ते बल्लारपूर मतदार संघात यावे असे आपल्याला वाटत असून १२५ कोटी खर्च करुन या शहराचा विकास करण्याची योजना आखल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी ३० कोटी निधीचा पहिला हप्ता जुलैमध्ये वितरीत केला आहे. टप्याटप्प्याने उर्वरित निधी दिला जाईल असे ते म्हणाले. ४० लाख रुपये खर्च करुन बल्लारपूर शहरात सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. बल्लारपूर शहर विकास आराखडयात नगर परिषद शाळा उत्तम करणे, अंतर्गत रस्ते, नाली बांधकाम, आरोग्य सेवा, वाचनालय यासह अनेक विकास कामाचा अंर्तभाव आहे. लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावर असून ती सेवाभावी वृत्तीने पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. सभागृह निमीर्तीसाठी ज्यांनी योगदान दिले त्यांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ साहा, उपाध्यक्ष संपत कोरडे, विपिन मुद्दा, डॉ. जयप्रकाश तुंबडे, चंदनसिंह चंदेल, डॉ. कोंडावार व डॉ. नितिन गायकवाड़ यांची यावेळी भाषण झाली. (प्रतिनिधी)
सुवर्ण महोत्सवी वर्ष आरोग्य उपक्रमांनी साजरे करा
By admin | Published: September 21, 2015 1:14 AM