चंद्रपूर : गतवर्षीप्रमाणे यंदाही होळी व रंगपंचमी उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने नागरिकांनी घरीच राहून साधेपणाने सण साजरा करावा व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
होळी व रंगपंचमी उत्सव जिल्ह्यात साजरा केला जातो. यंदा २८ मार्च २०२१ रोजी होळी सण आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, गर्दी न करता शारीरिक अंतर पाळावे, एकमेकांवर रंग व पाणी टाकणे, गुलाल लावून रंगाची उधळण करण्याची परंपरा आहे. परंतु, कोरोनामुळे यंदा स्वत:मध्ये बदल घडवून आणावा. वायू प्रदूषणाचा विचार करून होळी पेटवू नका. पाण्याचा अपव्यय टाळा, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम व मिरवणुकांचे आयोजन करू नका, मुलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्या, असे आवाहन पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केले. कोरोना लसीकरणामुळे आपण लवकरच विजय मिळवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.