चंद्रपूर: कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता रमजान ईद अत्यंत साधेपणाने व शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत साजरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
मुस्लीम धर्मीयांच्या पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ झाला आहे.
सध्या कोविड- १९ च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता, विशेष खबरदारी घेत रमजान ईद साजरी करणे आवश्यक आहे.
संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईदकरिता मुस्लीम बांधवांनी नियमित नमाजपठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करून ‘ब्रेक द चेन’ आदेशाचे काटेकोर पालन करावे. रमजान ईदनिमित्ताने महानगरपालिकेने तसेच स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असून, त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. त्या वेळेव्यतिरिक्त बाजारामध्ये सामान खरेदीकरिता गर्दी करू नये, राज्यात कलम १४४ लागू असल्याने तसेच रात्रीची संचारबंदी असल्यामुळे संचारबंदीच्या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत, तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.
रमजान ईदनिमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.