चिमूर (जि. चंद्रपूर) : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एकेकाळी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या बेपत्ता ‘माया’ (टी १२) वाघिणीचा अजूनही ठावठिकाणा लागला नाही. मात्र, मायाची जागा आता छोटी ताराने घेतली. तिनेही आता देश-विदेशातील पर्यटकांसह वन्यजीव अभ्यासकांवरही जणू गारुड केले आहे.
ताडोबात सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालणारी ताडोबाची राणी माया वाघीण ऑगस्ट २०२४ पासून बेपत्ता झाली आहे. ती बेपत्ता झाली की तिच्यासोबत बहेलिया टोळीकडून काही घातपात झाला, याबाबत तर्कवितर्क लावणे अद्याप थांबले नाही. ती शेवटची २५ ऑगस्ट २०२३ रोजी पंचधारा लोकेशनवर काही मजुरांना दिसली होती. ताडोबामधील ‘मटकासुर’ हा वाघ तिचा जोडीदार होता. पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या या वाघिणीचा फोटो डाक विभागाने टपाल तिकिटावर प्रकाशित केला आहे. ताडोबाची अनभिषिक्त राणी माया वाघिणीची रसभरीत जीवनकहाणी ग्रंथरुपातही वाचकांसमोर आली. परंतु, ती परत येण्याची शक्यता मावळल्याने तिची जागा आता छोटी तारा घेऊ लागली आहे.
अशी आहे छोटी तारा...
गळ्यात रेडिओ कॉलरचा पट्टा लावणारी ताडोबातील पहिली वाघीण असा लौकिक छोटी ताराने मिळवला आहे.
‘वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या वतीने पूर्व विदर्भातील काही निवडक वाघांच्या गळ्यात पट्टा लावून वाघांचा अभ्यास केला जात आहे.
नर वाघांनाच हा पट्टा लावण्यात आला होता. गळ्यात रेडिओ कॉलरचा पट्टा लावणारी ताडोबातील छोटी तारा ही पहिली ठरली आहे. आता तिचा काॅलर पट्टा काढला आहे.
रुबाबदारपणा कायम
‘बिजली’ व ‘रोमा’ या छोटी ताराच्या दोन मुली, तर छोटा मटका मुलगा आहे. ती आता उतारवयाकडे झुकली आहे. मात्र तिचा रुबाबदारपणा टिकून आहे.
एकेकाळी ताडोबातील पंढरपौनी भागात पर्यटनासाठी आले की, माया वाघिणीचे हमखास दर्शन व्हायचे. तिच्या अनेक मुद्रा डोळ्यांत साठवल्या. आता छोटी ताराने मायाची उणीव भरून काढली आहे.
केशव करापूरकर, वन्यजीवप्रेमी, मुंबई