चंद्रपूर : अल्ट्राटेक आणि अंबुजा सिमेंट कंपनीतील कामगारांनी वेतन वाढीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी विजय क्रांती कामगार संघटनेच्या नेतृत्वात सोमवार (दि. २९) पासून कामबंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनाबाबत मंगळवारी (दि. ३०) दुसऱ्या दिवशीही तोडगा न निघाल्याने दोन्ही कंपन्यांचे उत्पादन ठप्प आहे. परिणामी, सिमेंट कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला, असा दावा कामगार संघटनेने केला. संयुक्त चर्चेदरम्यान कंपनी व्यवस्थापनाने प्रलंबित मागण्या सोडविण्याचे मान्य केले, असे लेखी लिहून देण्याची कामगारांनी मागणी केली. मात्र, कंपन्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आंदोलन सुरूच आहे.
कंत्राटी कामगाराला २६ दिवस काम द्यावे, कुशल, अर्धकुशल व अकुशल कामगारांना श्रेणीनुसार १४०, १४५, १५० पगार वाढ द्यावी, वेज बोर्ड कर्मचाऱ्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या ठेका श्रमिकांना प्रत्येक दिवसाला अतिरिक्त २०० रूपये वाढ द्यावी, २०२१ मध्ये कंपनी व्यवस्थापनाने मान्य केल्याप्रमाणे कामाच्या ठिकाणी वापरण्यात येणारे दोन जोड कापड द्यावे, नवीन कंत्राटी कामगारांना ३५० मजुरीऐवजी वाढवून ५०० रुपये व हजेरी पंचिंगसाठी १५ मिनिट जास्त देण्याच्या मागणीसाठी आंदाेलन सुरू आहे. आमदार सुभाष धोटे, राजुराचे माजी नगराध्यक्ष अरूण धोटे, तहसीलदार पी. एस. व्हटकर, ठाणेदार रवींद्र शिंदे आदींनी कामगार आणि अल्ट्राटेक सिमेंट कंपनी व्यवस्थापनासोबत संयुक्त बैठकीत चर्चा केली. या चर्चेत कंपनी व्यवस्थापनाने मागण्या मान्य केल्याचे लिहून देण्याची आंदोलक कामगारांनी मागणी केली. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने लिहून देण्याबाबत स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आंदोलन सुरूच आहे.
कोरपना तालुक्यातील सिमेंट कंपन्यांना सिमेंटसाठी लागणारा कोळसा व चुनखडी कंपनीच्या अगदी जवळपास असल्याने उत्पादन खर्च कमी लागतो. त्यामुळे चारही सिमेंट कंपन्यांचा दररोजचा निव्वळ नफा एक कोटी रुपयांपर्यंत आहे. कामबंद असल्यामुळे एका दिवसात या दोन्ही कंपन्यांचा मिळून सुमारे ७० लाखांचा शासकीय महसूल बुडाला आहे.-विजय ठाकरे, जिल्हाध्यक्ष, विजय क्रांती कामगार संघटना
कामबंद आंदोलनामुळे अल्ट्राटेक व अंबुजा सिमेंट कंपन्यांचे लोडिंगअभावी रेल्वेद्वारे मालवाहतूक थांबली. कंपनीवर ताशी दरानुसार दंड बसत आहे. पुरुष कामगारांसोबत महिला कामगारही कंपनीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करीत आहेत. कामगारांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन पुन्हा तीव्र करू.-सुनील ढवस, महासचिव, विजय क्रांती कामगार संघटना अल्ट्राटेक, आवारपूर
एप्रिल २०२३ पासून कामगारांच्या वेतनात झालेली वाढ ॲरियर्सच्या रूपाने देण्यात येईल. याबाबत कामगार संघटना व व्यवस्थापनाचे प्रकरण कामगार न्यायालयात प्रविष्ठ असून निकालाची प्रतीक्षा आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आम्ही कामगारांना वेतनवाढ देऊ. त्यामुळे कामगारांनी आंदोलन मागे घ्यावे.-नारायणदत्त तिवारी, व्यवस्थापक (इ. आर.) अल्ट्राटेक सिमेंट, आवारपूर