चंद्रपूर: शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था तसेच जनावरांना पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने जिल्हा परिषदेने सिमेंट प्लग बंधारे बांधकामासाठी मंजुरी दिली आहे. या बंधारे बांधकामात सावली, चिमूरला झुकते माप देण्यात आले आहे. तर चंद्रपूर तालुक्यात एकाही बंधाऱ्याला मंजुरी देण्यात आली नाही. जिवती, भद्रावती, गोंडपिपरी, बल्लारपूर तालुक्यात प्रत्येकी तीन ते चार बंधाऱ्याचा समावेश असल्याचे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.दिवसेंदिवस पाणी टंचाईची झळ बसत आहे. त्यामुळे पाणी साठवणूक आणि जपून पाण्याचा वापर करणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागात पाणी साठवण क्षमता वाढविणे गरजेचे आहे. यानुसार जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद सेस फंडातून तसेच आदिवासी विकासातून २०१३-१४ अंतर्गत सिमेंट प्लग बंधारे बांधकाम हाती घेतले आहे. मात्र सदर बांधकाम करताना जिल्हा परिषदेने दुजाभाव केला आहे. ज्या सदस्यांनी आपल्या वजनाचा वापर केला त्याच सदस्यांच्या प्रभागामध्ये जास्त प्रमाणात बंधारे बांधकामाला मंजुरी दिल्याचा आरोप काही सदस्यांनी केला आहे. काही तालुक्यांमध्ये एकही बंधारा बांधण्यात आला नसल्याचे चित्र आहे. एकट्या चिमूर तालुक्यामध्ये तब्बल २४ तर, सावली तालुक्यात १४ बंधारे बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली आहे. जिवती तालुक्यात केवळ ३ बंधाऱ्यांचा समावेश आहे.बंधारे मंजूर करताना अन्य सदस्य तथा पदाधिकाऱ्यांचा विचार करण्यात आला नसल्याचे आता सदस्यांमध्ये बोलल्या जात आहे. मंजर बंधाऱ्याची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)
सिमेंट प्लग बंधाऱ्यात चंद्रपूरला डावलले
By admin | Published: June 23, 2014 12:00 AM