ब्रह्मपुरी : शहात कोणे एके काळी शैक्षणिक वातावरणाशिवाय अन्य कुठल्याही दुर्गंधीचा वास नव्हता. परंतु, अलीकडे शैक्षणिक वातावरणात अन्य घटना फोफावत असल्याने ब्रह्मपुरीसारख्या सुशिक्षीत नगरीला गालबोट लागत असल्याने सुजाण नागरिक अशा घटनांबाबत चिंता व्यक्त करीत आहेत. याला मुख्य कारण म्हणजे शहरातील निर्जन स्थळे असल्याचे मत व्यक्त होत अशीच स्थळे दिवसेंदिवस गुन्हेगारीचे केंद्र बनत असल्याने अशा स्थळांवर विशेष लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. निकालामध्ये तालुक्याची स्थिती समाधानकारक आहे. पण उत्तम नाही. कारण ब्रह्मपुरीतून पहिला, तिसरा विदर्भातून मेरीट आल्याचे उदाहरणे आहेत. ती उदाहरणे पुढे वाढू शकली नाही आणि टक्केवारी घसरू लागली आहे. अनेक महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी या ना त्या कारणात गुरफटल्या जात आहेत आणि नको त्या घटना शहरात घडत आहेत. अजय रामटेके खून प्रकरणातील आरोपी तुषार येरावार हा सामान्य कुटूंबातील तंत्रनिकेतनचा विद्यार्थी होता. तर मृत अजय रामटेके हा वडील शासकीय सेवेतील सेवानिवृत्त झालेल्या कुटूंबातील मुलगा होता. दोघांचेही वय शिक्षण घेणाऱ्या अवस्थेचे असताना एकमेकांचे वैरी होऊन एकाला जिवानिशी मारून तर दुसरा जिवंतपणी मरण यातना भोगणाऱ्या अवस्थेत गेला आहे. त्यामुळे शैक्षणिक नगरीला कलंक लागण्यासारखे कृत्य घडले आहे. हे कृत्य दिवसेंदिवस अंधाराचा फायदा घेवून होत असल्याचे या घटनेवरुन उघडकीस आले आहे. वनविभागाच्या पटांगणावर बोंडेगाव गिट्टी खदान परिसर, हुतात्मा स्मारक मागील परिसर, खेड रोड परिसर, चांदगाव रोड परिसर, बोरगाव रोड परिसर, व अन्य निर्जन स्थळे सायंकाळी गर्दीने फुललेले असतात. मित्र, मैत्रिणी या परिसरात रात्री दहा-अकरा वाजेपर्यंत वावर करताना दिसतात. याकडे कुणाचेही लक्ष जात नाही व गेलेच तर दुर्लक्ष केल्या जात असल्याने अशा घटना घडत असतात. याकडे पोलिसांनी लक्ष देऊन अनैतिक घटना रोखण्याचे आव्हान आहे. (तालुका प्रतिनिधी)
निर्जनस्थळे बनताहेत गुन्हेगारीची केंदे्र
By admin | Published: June 13, 2016 2:33 AM