शंतनु गोयल गडचिरोलीचे नवे सीईओचंद्रपूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांची बुधवारी शासनाने बदली केली. त्यांना ठाणे येथे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. तर राजुऱ्याचे उपविभागीय अधिकारी शंतनु गोयल यांनाही पदोन्नती देत गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली केली आहे. बदलीमुळे रिक्त झालेल्या दोन्ही जागांवर अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नसून नवे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असणार, याबाबत उत्सुकता लागून आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एक वर्षापूर्वी महेंद्र कल्याणकर रूजू झाले होते. मात्र त्यांना पदोन्नती देत जेमतेम एक वर्षाच्या काळातच बदली करण्यात आली. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील येथे कार्यरत असताना जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांवर त्यांचा चांगला वचक होता. त्यांनी विविध उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या कामाकाजात पारदर्शीपणा आणला होता. त्यानंतर महेंद्र कल्याणकर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रूजू होताच, त्यांनीही स्वच्छ प्रशासनावर भर देत जिल्हा परिषदेमार्फत विकासात्मक कामे राबविली. त्यांच्या कार्यकाळात ब्रह्मपुरी व बल्लारपूर या दोन पंचायत समित्यांना राज्य शासनाचे पुरस्कारही प्राप्त झाले. त्यामुळे त्यांचा जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर चांगला वचक होता. मात्र त्यांना पदोन्नती देत ठाणे येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आल्याने कामचुकार अधिकाऱ्यांमध्ये आनंदीआनंद पसरला आहे. तर राजुऱ्याचे उपविभागीय अधिकारी शंतनु गोयल यांनाही पदोन्नती देत गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांच्या ठिकाणी कोणचीही नियुक्ती झालेली नसून नवे अधिकारी कोण असणार, याकडे लक्ष लागून आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
सीईओ कल्याणकर यांची ठाणे येथे बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2016 1:03 AM