चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहे. मात्र त्यांच्या सेवासमाप्ती तसेच बाह्य संस्थेकडून भरतीसंदर्भात कर्मचारी संतापले असून विविध मार्गाने आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, १४-१५ डिसेंबर रोजी मुंबईत कुटुंबासह कर्मचारी धडकणार असून सरकारकडे आत्महत्येेची परवानगी मागणार आहे. त्यामुळे उमेद प्रशासनाची झोप उडाली असून अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी राज्यभरातील सर्व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या कर्मचाऱ्यांची मनधरणी करून त्यांना आंदोलनापासून परावृत्त करावे तसेच तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. त्यामुळे आता जिल्हास्तरावर सीईओ उमेदच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची कशी मनधरणी करणार
याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कंत्राटीपद्धतीने कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र त्याच्या सेवासमाप्ती तसेच बाह्य संस्थेकडून नव्याने पदभरती करण्यासंदर्भात शासनस्तरावर हालचालीसुरु करण्यात आल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्याची चिंता सतावत आहे. दरम्यान विविध आंदोलन, मोर्चा काढून या कर्मचाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच उपयोग झाला नसल्याने आता कर्मचारी कुटुंबासह थेट मुंबईला धडक देणार आहे. विशेष म्हणजे, या आंदोनात मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येची परवानगी मागणार आहे. या आंदोलनाची महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाती मुख्य कार्यकारी अधिकारी उय जाधव यांनी दखल घेतली असून आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांनी पूर्णपणे प्रयत्न सुरु केले आहे. दरम्यान, राज्यभरातील सर्व सीईओंना पत्र पाठवून मंत्रालयावरील धडक मोर्चापासून त्यांना परावृत्त करून मनधरणी करून आवश्यत उपाययोजना करावी तसेच आंदोलनाचा कामकाजावर परिणाम होणार नाही यासाठी आवश्यक तरतूद करण्याचे पत्र पाठविले आहे. त्यामुळे आता जिल्हास्तरावर सीईओ या कंत्राटी कर्मचाऱ्यांसंदर्भात काय निर्णय घेते, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कर्मचाऱ्यांच्या वतीने अखेरचा जय महाराष्ट्र
विविध आंदोलन करूनही शासनस्तरावर कोणतीही दखल घेतली नसल्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून उमेद अभियानातील १० हजार कर्मचारी कुटुंबीयांसोबत मुंबईत आंदोलन करणार आहे. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला ई-मेलद्वारे माहिती दिली असून सर्वात शेवट सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने अखेरचा जय महाराष्ट्र असेही लिहण्यास विसरले नाही. त्यामुळे हे आंदोलन नेमके कोणती वळण घेते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.