गोंडपिपरी : स्थानिक नगरपंचायतीमध्ये शहर स्वच्छतेचे तत्कालीन कंत्राट हे स्वयम रोजगार संस्था अहेरी या संस्थेकडे होते; मात्र कंत्राट घेणाऱ्या संस्थेने सफाई कामगारांचे भविष्य निर्वाह निधीचा वेळेत भरणा न करता नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी साटेलोटे करून देयकांची उचल केली. यामुळे सफाई कामगारांचे नुकसान झाल्याच्या आरोपावरून शुक्रवारपासून नगरपंचायत सफाई कामगारांनी न. प. जवळच साखळी उपोषणास सुरुवात केली आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी स्थानिक नगरपंचायत अंतर्गत स्वच्छतेचे कंत्राट स्वयम् रोजगार संस्था अहेरी यांना मिळाले. या करारानुसार त्यांनी शहरातीलच कामगारांना कामावर घेतले. सफाई कामगारांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले असतानाही कंत्राटदाराने सफाई कामगारांचा ईपीएफ (भविष्य निर्वाह निधी )भरण्यापूर्वीच देयके उचलून सफाई कामगारांचे नुकसान केले तर यात नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग असून या मिलीभगतमुळे सफाई कामगारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाची दिशाभूल करून ईपीएफचा भरणा न करता देयके उचलणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा. तसेच याला हातभार लावणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत आज स्थानिक नगरपंचायतजवळ सफाई कामगारांनी उपोषणास सुरुवात केली. न्याय मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे जय भवानी कामगार संघटनेचे अध्यक्ष सूरज ठाकरे
यांनी सांगितले.