महिलांची बाईक रॅली : दिला सामाजिक संदेश, मराठी नववर्षाचे स्वागत भद्रावती : भद्रावती युवा प्रतिष्ठान व बजरंग दल शाखा भद्रावतीच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडवा उत्सव व भव्य शोभायात्रेचे आयोजन भद्रावतीत मंगळवारला करण्यात आले होते. यावेळी हनुमान मंदिर, संताजी नगर ते मुख्य मार्गाने नागमंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. सदर शोभायात्रतून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले होते. मंदिर परिसरात गुढीची पुजा करून शोभायात्रेला सुरूवात झाली. सर्वात प्रथम महिलांची बाईक रॅली काढण्यात आली. यामध्ये शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. बाईक रॅलीला आ.बाळू धानोरकर यांनी भगवी झेंडी दाखविल्यानंतर सुरूवात झाली. त्यानंतर शोभायात्रा सुरू झाली. याप्रसंगी संतोष आमने, रोहन कुटेमाटे, अभिजीत नारळे, प्रशांत डाखरे, प्रा. सचिन सरपटवार, प्रा. सुरेश परसावार, उदय गायकवाड उपस्थित होते. शोभायात्रेने भद्रावतीकरांमध्ये एकप्रकारचे चैतन्य निर्माण केले. शोभायात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिकांची गर्दी होती. शोभायात्रेत सर्वात समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभुषेत घोड्यावर स्वार युवकाने भद्रावतीकरांना आकर्षीत केले. त्यांच्या मागे जवळपास १२ घोड्यांवर मावळे स्वार होते. ढोल-ताशांचा दणदणाट होता. महिलाही ढोल ताशाच्या तालावर ठुमकत होत्या. गोंडी नृत्यामुळे तर तरूणाई अक्षरश: थिरकत होती. शेगाव येथील भजन पथकाने नागरिकांना आपल्या भजनातून सामाजिक संदेश दिला. दुर्गा पथकातील युवतींनी सर्वांमध्ये एक प्रकारची स्फुर्ती निर्माण केली. या पथाकातील युवातीचे भगवा झेंडा घेवून तालबद्ध नाचणे सर्वांना आकर्षीत करत होते. गुढी उभारलेला रथ व त्यावरील प्रभु रामचंद्राचे तैलचित्रही आकर्षीत करणारे होते. शोभायात्रेच्या शेवटी असलेल्या डिजेच्या तालावर तर अख्खी तरुणाई थिरकत होती. नागमंदिर येथे शोभायात्रेची सांगता झाली. या शोभायात्रेत नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी, विवेक गोहणे, पंकज ठाकरे, सुनिल नामोजवार, प्रा. विनोद घोडे, मुनाज शेख, गजानन नागपुरे, प्रमोद नागोसे, भद्रावती युवा प्रतिष्ठान व बजरंग दलाचे कार्यकर्ते, शहरातील नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
भद्रावतीत शोभायात्रेने निर्माण केले चैतन्य
By admin | Published: April 01, 2017 1:39 AM