कोरपना : कोरपना ते वणी राज्य महामार्ग दरम्यान असलेल्या चारगाव चौकी ते बोरी जिल्हा सीमा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हा सीमेवरील ढाकोरी (बोरी) येथे गुरुवारी दोन तास चक्का जाम आंदोलन केले.
या आंदोलन दरम्यान रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब लागल्या होत्या. या महामार्गाची गेल्या पाच वर्षांपासून अत्यंत दुरवस्था झाली आहे. मात्र त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने वाहनधारक व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या अनुषंगाने बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी आंदोलन केले. वणी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी ढाकोरी सरपंच अजय कवरासे, बोरीचे सरपंच योगराज बदखल, गोवरीचे सरपंच रवींद्र बदखल, राजेंद्र ईद्दे, मिनाथ काकडे, ज्ञानेश्वर ठाकरे ,संदीप देवतळे, राजू दुर्गे, विठ्ठल ठाकरे, संजय मुसळे व समस्त ढाकोरी, बोरी, कुरई, देउरवाडा, गोवरी, निंबाळा येथील गावकरी उपस्थित होते.